

भंडारा : भंडारा आयुध निर्माणीत 24 जानेवारी रोजी झालेल्या भीषण स्फ़ोटात 9 कर्मचारी ठार तर 4 गंभीर झाले होते. या प्रकरणी तपासाअंती आयुध निर्माणीच्या 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांवार गुन्हे दाखल केले आहेत. मुख्य महाप्रबंधक सुनील सप्रे, महाप्रबंधक ए.के.प्रसाद, महाप्रबंधक ललित कुमार या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.
आयुध निर्माणी भंडारा येथे २४ जानेवारी २०२५ रोजी एल. टी. पी. ई. विभागातील बिल्डिंग २३ मध्ये झालेला स्फोटात एकूण ९ कर्मचारी ठार तर ४ कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. स्फोटाची चौकशी करण्याकरिता जवाहर नगर चे पोलिस निरीक्षक भीमाजी पाटील यांच्या अध्यक्षतेत समितीचे गठण करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार आयुध निर्माणीच्या त्या विभागातील यंत्रणा ह्या जुन्या काळातील असून त्यांची देखभाल दुरुस्ती करण्यात आली नव्हती. कर्मचाऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात सुरक्षा किट किंवा सामुग्री पुरवठ्याकडे वरिष्ठांनी वारंवार दुर्लक्ष केला गेल्याने हा स्फोट झाला असा पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले असल्याने या निर्माणीतील मुख्य महाप्रबंधक सुनील सप्रे, महाप्रबंधक ए.के प्रसाद, महाप्रबंधक ललित कुमार या वरिष्ठ तीन अधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आले आहे.
या पूर्वी सेफ्टी सेक्शनचे विभागीय अधिकारी देवेंद्र रामदास मीना (वय ४९), मेंन्टनन्स विभागाचे ज्युनिअर वर्क मॅनेजर आदिल रशील फारुकी (वय ४६), सामान्य प्रशासन विभागाचे संजय सुरेश धपाडे (वय ४४), सेक्शन प्रभारी अधिकारी आनंदराव मधुकरराव फाये (वय ५०) यांच्यासह आयुध निर्माणी जवाहरनगर व्यवस्थापनातील इतर जबाबदार अधिकारी हे कारणीभूत झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.