

भंडारा : मोहाडी तालुक्यातील ढोरवाडा-सुकळी परिसरात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर वाळू तस्करांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने आपल्या ट्रॅक्टरने पोलीस वाहनाला जोरात धडक दिली. यामध्ये एक पोलीस हवालदार जखमी झाले असून वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा, भंडाराचे पोलीस उपनिरीक्षक राजू मुरलीधर सोनपितरे आपल्या पथकासह खासगी वाहनाने गस्तीवर होते. वैनगंगा नदीपात्रातून वाळूची अवैध चोरी होत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी ढोरवाडा ते सुकळी मार्गावर सापळा रचला. नाकाबंदीदरम्यान वाळूने भरलेला (MH 36 AZ 9124) क्रमांकाचा ट्रॅक्टर येताना दिसला. पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने वेग कमी केला. मात्र, पोलीस हवालदार रमेश बेदुरकर (४०) हे ट्रॅक्टरमधील वाळूचा परवाना तपासण्यासाठी वाहनातून खाली उतरत असतानाच, आरोपी चालकाने अचानक ट्रॅक्टरचा वेग वाढवला.
तस्कराने ट्रॅक्टर थेट पोलीस वाहनाच्या दिशेने वळवून जोरदार धडक दिली. या धडकेत वाहनाचा दरवाजा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. दरवाजाजवळ उभे असलेले हवालदार रमेश बेदुरकर हे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या धडकेत गंभीर जखमी झाले. घटनेनंतर आरोपी ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला. ट्रॉलीमध्ये सुमारे १ ब्रास अवैध रेती होती.
पोलीस उपनिरीक्षक राजू सोनपितरे यांच्या तक्रारीवरून मोहाडी पोलिसांनी आरोपी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल चौधरी करत असून फरार आरोपी आणि ट्रॅक्टरचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली आहेत. रेती माफियांनी थेट पोलिसांवरच हल्ला केल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे.