

भंडारा: साकोली पंचायत समितीच्या सभापतींनी मासिक सभा संपल्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उद्देशुन अश्लिल शिवीगाळ केली. त्यांच्या या अशोभनीय वर्तनाचे जोरदार पडसाद उमटले असून जोपर्यंत सभापती जाहिर माफी मागत नाही, तोपर्यंत लेखनीबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. हा लज्जास्पद प्रकार १९ सप्टेंबर रोजी घडला.
१९ सप्टेंबर रोजी साकोली पंचायत समितीची मासिक सभा होती. सभा संपल्यानंतर सभापती ललित शंकर हेमने यांनी पंचायत समितीमधील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना उद्देशून अश्लिल शिवीगाळ केली. ‘अधिकारी, कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय कोणतेही काम करीत नाहीत. दारुसाठी मागेमागे येतात’, अशा प्रकारच्या अशोभनिय भाषेत स्वत:च्या कक्षात व कक्षाबाहेर मोठ्या आवाजात ओरडले. कार्यालयातील महिला अधिकारी, कर्मचारी उपस्थित असतानासुद्धा त्यांचे हे वर्तन सुरूच होते.
ही बाब कार्यालयीन दृष्टीने अत्यंत अशोभनिय असून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आत्मसन्मान खच्चीकरण करणारी आहे. या प्रकरणामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. सदर घटनेचा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध केला असून सभापती ललित हेमने जोपर्यंत घडलेल्या प्रकाराबाबत पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत लेखनी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याबाबतचे निवेदन आ. नाना पटोले यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. २६ सप्टेंबरला पंचायत समितीची बैठक असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यानी बहिष्काराचा इशारा दिला आहे.