

भंडारा: दुचाकीने जाणाऱ्या तरुणाला कारने उडविले. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास अड्याळ पोलिस ठाणे हद्दीतील पवनी मार्गावरील सहायतानगर येथे घडली.
अविनाश घनश्याम जिभकाटे (३०) रा. कोंढा ता. पवनी असे मृतकाचे नाव आहे. अविनाश हा दुचाकीने कोंढा येथे जात असताना भरधाव कारने त्याला मागेहून धडक दिली. अपघातानंतर तो कारच्या काचावर आदळला आणि रस्त्यावर कोसळला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
त्याला आधी अड्याळच्या ग्रामीण रुग्णालय व नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी अड्याळ पोलिसांनी कारचालक आर्यन नरेश घोरमोडे (२१) रा. कोंढा याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास सुरू आहे.