

भंडारा : अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या यादीत मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आल्याने आथली गावातील संतप्त शेतकऱ्यांनी आज (दि.९) लाखांदुर तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. तसेच या प्रकरणाची चौकशी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा, यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
आथली गावात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते. त्यामुळे शासन निर्देशानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीचा मोबदला मिळावा, यासाठी स्थानिक तलाठी व ग्रामसेवक यांच्यामार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांच्या याद्या तयार करण्याचे निर्देश लाखांदुरचे तहसीलदार वैभव पवार यांनी तलाठी व ग्रामसेवकांना दिले होते. मात्र आथली गावातील तलाठी व ग्रामसेवक यांनी या सुचनेकडे दुर्लक्ष करून ग्रामपंचायतीत कार्यरत कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण व याद्या तयार करायला लावले.
दरम्यान ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांनी शासन नियमांना तिलांजली देत ओलीताखाली असलेल्या शेतकऱ्यांना कोरडवाहू दाखविले. तर कोरडवाहू शेतकऱ्यांना ओलीताखाली दाखविले. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांची कमी शेती दाखविली असून नुकसान न झालेल्यांच्या पुर्णत: शेतीचे नुकसान दाखविले आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी हा प्रकार मनमर्जीतील लोकांसाठी पैसे घेऊन केला असल्याचा आरोप देखील स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह आथली ग्रामस्थांनी केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देताना लाखांदुरचे तहसीलदार वैभव पवार उपस्थित नसल्यामुळे पिडीत शेतकऱ्यांनी काही काळ तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर नायब तहसीलदार धकाते यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन निवेदन स्विकारले. यावेळी पं.स. सदस्य पुरूषोत्तम ठाकरे, डेलीस ठाकरे, सरपंच बागडे, ग्रा.पं. सदस्य चंद्रशेखर ठाकरे, दिनेश सोनपिंपळे, नरेश बेदरे, नरेश प्रधान, मेघशाम सुखदेवे, पुंडलीक नागोसे, श्रीहरी ठाकरे, प्रदीप भावे, देवा करकाडे, सिलवंत बांबोळे, पुरूषोत्तम कुंभलकर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.