

भंडारा- नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या (एएनटीआर) प्रशासकीय इतिहासात २४ डिसेंबर रोजी एक सुवर्णपान जोडले गेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला 'एकसंघ नियंत्रण' (युनिफाईड कंट्रोल) आराखडा महाराष्ट्र शासनाने मंजूर केला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता व्याघ्र प्रकल्पाचे कोअर (गाभा) आणि बफर क्षेत्र अशा दोन्ही भागांवर क्षेत्र संचालकांचे थेट प्रशासकीय नियंत्रण असणार आहे. प्रादेशिक वनविभाग आणि वनविकास महामंडळाचे बफर क्षेत्रावरील अधिकार आता पूर्णपणे व्याघ्र प्रकल्प प्रशासनाकडे वर्ग झाले आहेत.
काय आहे 'एकसंघ नियंत्रण'?
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या निकषांनुसार, व्याघ्र प्रकल्पाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी संपूर्ण क्षेत्रावर एकाच विभागाचे नियंत्रण असणे गरजेचे असते. आतापर्यंत ६५३.६७४ चौ.कि.मी.चे कोअर क्षेत्र वन्यजीव विभागाकडे होते, तर ६४८.२१ चौ.कि.मी.चे बफर क्षेत्र प्रादेशिक विभाग व एफडीसीएमकडे विभागलेले होते. नव्या निर्णयामुळे आता संपूर्ण १३०१.८८३ चौ.कि.मी. क्षेत्राचे व्यवस्थापन थेट व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून होईल.
प्रशासकीय पुनर्गठन : नवी खंडे व मुख्यालये प्रभावी
देखरेखीसाठी व्याघ्र प्रकल्पाचे दोन मुख्य खंडांत विभाजन करण्यात आले आहे. नागझिरा खंड (मुख्यालय: गोंदिया) प्रमुख: उपसंचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदिया. त्याची व्याप्ती नागझिरा, नवीन नागझिरा, कोका, गडेगाव, पिटेझरी आणि सडक अर्जुनी यांसह ०८ वनपरिक्षेत्र असेल. सहायक वनसंरक्षक पदे: तिरोडा, गोंदिया आणि साकोली येथे एसीएफ कार्यालये असतील.
नवेगाव खंड (मुख्यालय: साकोली) प्रमुख: विभागीय वन अधिकारी (नवेगाव), साकोली. त्याची व्याप्ती नवेगाव पार्क, डोंगरगाव, झाशीनगर आणि बोंडे ही ०४ वनपरिक्षेत्र. सहायक वनसंरक्षक पद: साकोली येथे मुख्यालय असेल.
निर्णयाचे दूरगामी फायदे
शिकार व तस्करीवर रोख: संपूर्ण १३०१ चौ.कि.मी. क्षेत्रावर आता 'विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या' ३ तुकड्या अधिक सक्षमपणे गस्त घालतील. मानव-वन्यजीव संघर्ष निवारण: बफर क्षेत्रातील गावांशी समन्वय साधणे आणि वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसान भरपाईची प्रक्रिया आता अधिक जलद होईल.
पर्यटन विकास व मालमत्ता
कोअर आणि बफरमध्ये आता पर्यटन नियम एकसमान असतील. तसेच प्रादेशिक विभागाकडील सर्व निवासस्थाने, नाके आणि वाहने आता व्याघ्र प्रकल्पाच्या ताब्यात येतील. या निर्णयामुळे एफडीसीएमच्या गोंदिया कार्यालयाचे भंडारा कार्यालयात समायोजन करण्यात आले आहे. उन्हाळी पर्यटनापूर्वी झालेल्या या बदलामुळे वन्यजीव प्रेमींना आता कोअर आणि बफरमध्ये अधिक चांगल्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.