भंडारा: जिल्ह्यातील पेट्रोलपंप ठाणा (जवाहरनगर) येथील कला, वाणिज्य पदवी महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या सहाव्या सेमिस्टर परीक्षेचे केंद्र देण्यात आले आहे. या परीक्षा केंद्रावर भंडारा तालुक्यातील भिलेवाडा येथील पांडव कॉलेज ऑफ इंजीनियरिंग व शहापूर येथील एमआयईटी इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी परीक्षा देण्याकरिता मोठ्या प्रमाणावर येत आहेत. याचाच फायदा घेऊन या कॉलेजमधील काही शिक्षक व कर्मचारी या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन कॉपी पुरवीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ द्वारा इंजिनिअरिंग कॉलेज सहाव्या सेमिस्टर परिक्षा सुरू आहेत. या परीक्षा मूळ कॉलेज सोडून इतर कॉलेजमध्ये घेण्याचे विद्यापीठाने ठरविले असून,जवाहरनगर पेट्रोलपंप ठाणा येथील कला, वाणिज्य पदवी महाविद्यालयात भंडारा तालुक्यातील भिलेवाडा येथील पांडव कॉलेज ऑफ इंजीनियरिंग व शहापूर येथील एमआयईटी इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी या केंद्रावर परीक्षा देत आहेत. या परीक्षा केंद्रावर परीक्षेदरम्यान मोठा घोळ व कॉपीचा भडीमार सुरू असल्याचे दिसून येत आहे. खोली क्रमांक २० येथील काही विद्यार्थ्यांनी इंविज्युलेटर म्हणून नियुक्त असलेल्या शिक्षकासमोरच पुढे असलेले डेस्क बेंच मागे हलविले व कॉपी करण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार शिक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी दोन वाजता मुलांच्या हातात दिलेला पेपर परत घेतला व किमान एक तासासाठी चार विद्यार्थ्यांना परीक्षार्थी रूम बाहेर केले. कॉलेजच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर बाथरूमपासून सायकल स्टॅन्डपर्यंत कॉप्यांचा भरमसाठ महापूर आल्याचा दिसून येत होते. संबधित चार विद्यार्थ्यांचा माफीनामा ठाणा पेट्रोलपंप कॉलेज प्रशासनाला दिला आहे.
परंतु इतक्या गंभीर स्वरूपाच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू असताना नागपुर विद्यापीठाचे भरारी पथक कॉलेजमध्ये नियंत्रणासाठी येत नाही. एकीकडे जिल्हाधिकाºयांकडून कॉपीमुक्त अभियान राबविले जाते तर दुसरीकडे अशा महाविद्यालयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कॉपी पुरविल्या जातात. या गैर प्रकारावर आळा कसा बसणार, या कॉलेजमधील शिक्षक व कर्मचारी पैसे घेऊन विद्यार्थ्यांना कॉपी पुरविल्या जातात का? असे परीक्षांर्थीचे पालक प्रश्न उपस्थित करीत आहेत.
आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी चूक केली. घडलेल्या प्रकारची दिलगिरी व्यक्त करून तसे माफीनामा पत्र परीक्षा केंद्राला देण्यात आले आहे. व यापुढे अशी चूक आमच्या विद्यार्थ्यांकडून होणार नाही याची हमी घेतो. असे एमआयईटी इंजिनिअरिंग कॉलेज शहापूरचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद हरडे यांनी स्पष्ट केले.