

भंडारा: तुमसर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गायमुख येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील चौरागड देवळात एका व्यक्तीने गळफास लावून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कैलास सिंगनगुडे (रा. हसारा, तुमसर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
नेमकी काय घटना घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, कैलास सिंगनगुडे हे गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते. दीर्घकाळ सुरू असलेले उपचार आणि शरीरातील तीव्र वेदनांमुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते. या सततच्या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. गायमुख येथील चौरागड मंदिरात त्यांनी गळफास लावून घेत स्वतःचे जीवन संपवले.
पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. कैलास यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आत्महत्येमागे आजारपणाशिवाय इतर काही कारणे आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.