भंडारा : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासकांनी बनावट अनुभव प्रमाणपत्र जोडून नोकरी मिळविल्याचा प्रकार समोर आला. माहिती अधिकारांतर्गत मिळविलेल्या माहितीतून ही बाब समोर आली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.
सखी वन स्टॉप सेंटरमध्ये केंद्र प्रशासक म्हणून लता भूरे या कार्यरत आहेत. केंद्र प्रशासक म्हणून नियुक्ती मिळविण्यासाठी अटी व शर्ती घालून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार लता भूरे यांनी विविध ठिकाणी काम केल्याचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र महिला व बालविकास विभागाला सादर केले. विशेष म्हणजे, महिला व बालविकास विभागाने सदर प्रमाणपत्रांची शहानिशा करुन नियुक्ती देणे अपेक्षित असताना या विभागाने कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता भूरे यांना नियुक्ती आदेश दिला.
दरम्यान, भंडारा येथील रहिवासी अरविंद हलमारे यांनी भूरे यांनी सादर केलेल्या अनुभव प्रमाणपत्राची प्रत माहिती अधिकारांतर्गत मागितली असता हा प्रकार समोर आला. लता भूरे यांनी राजे छत्रपती मुकबधिर निवासी विद्यालयात समुपदेशनाचे कार्य केल्याचे अनुभव प्रमाणपत्र सादर केले आहे. वास्तविकता राजे छत्रपती मुकबधिर निवासी विद्यालय प्रशासनाने लता भूरे यांना कोणतेही अनुभव प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याचे सांगितले आहे. तसेच राजिव ग्रामिण विकास बहु. शिक्षण संस्था वरठी येथे लता भूरे यांनी केंद्र सहाय्यक पदावर कार्य केल्याचे अनुभव प्रमाणपत्र सादर केले आहे. तेही प्रमाणपत्र खोटे असल्याचे सदर संस्थेने पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या दोन्ही संस्थेमध्ये लता भूरे यांनी काम केले नसल्याचे दिसून येते. तरीसुद्धा जिल्हा महिला व बालविकास विभागाने त्यांची नियुक्ती केंद्र प्रशासक या पदावर केली आहे.
हा प्रकार शासनाची दिशाभूल करणारा असून याची तक्रार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे. परंतु, कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप तक्रारकर्ते अरविंद हलमारे यांनी केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अरविंद हलमारे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आणि पोलिस निरीक्षकांकडे केली आहे. या प्रकाराबाबत प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तुषार पौनिकर यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.