छत्तीसगडमधील रेतीची महाराष्ट्रात तस्करी

तीन ट्रक ताब्यात: दोघांना अटक, चार फरार
Chhattisgarh Sand Smuggling |
पोलिसांनी ताब्यात घेतलेले ट्रक आणि आरोपी.Pudhari Photo
Published on
Updated on

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील शुभ्र रेतीच्या तस्करीचा मुद्दा गाजत असताना आता छत्तीसगड राज्यातील रेतीची महाराष्ट्रात तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी नाकाबंदी करत तस्करी करणाऱ्या तीन ट्रकसह दोघांना अटक केली आहे. तर एक आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला. पोलिसांनी तीन चालक आणि तीन ट्रक मालक यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला. एका ट्रकचालकासह तीन ट्रक मालक फरार आहेत. ही कारवाई राष्ट्रीय महामार्गावरील कारधा चौक येथे करण्यात आली.

संतोष भारत चव्हाण (३२, रा. म्हसनी ता. मानोरा जि.वाशिम), शेख अकबर शेख अजगर (३०, रा. शतरंजीपुरा बाळापूर जि.अकोला) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून मुकेश सच्चानंद थड्डानी (४२, रा.कारंजा लाड जि.वाशिम), निलेश रमेशराव अनवाडे (४०, रा. हिंगणा रोड अकोला), परविंदरिसंग जगतारसिंग ढिलोंन (रा. गणराजनगर नांदेड) या ट्रकच्या मालकांसह एक चालक फरार आहे. या कारवाईत पोलिसांनी रेतीसह १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

१८ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास कारधा पोलिसांना छत्तीसगडमधून रेतीची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन ठाणेदार पिसाळ यांनी पथकासह कारधा चौक येथे सापळा रचला. नाकाबंदीदरम्यान लाखनीकडून भंडाराकडे येणाऱ्या मार्गावर ट्रक येताना दिसले. पोलिसांनी त्यांना अडविताच संतोष चव्हाण, शेख अकबर शेख अजगर या दोन चालकांना अटक करण्यात आली. तर एका ट्रकचा चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. या प्रकरणी पोलिसांनी तीनही ट्रकचालकांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. सदर ट्रकचालक मालकांच्या सांगण्यावरुन रेतीची वाहतूक करत असल्याने पोलिसांनी ट्रकमालकांनाही आरोपी करण्यात आले आहे. ट्रकमालक सध्या फरार आहेत. संपूर्ण कारवाईत पोलिसांनी १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात कारधा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पिसाळ, पोलिस हवालदार दिलीप धावडे, त्र्यंबक गायधने, रत्नाकर लाडे, सचिन बावनकुळे यांनी ही कारवाई केली.

नागपूरातून पुढे होणार होती तस्करी

अटक केलेल्या ट्रकचालकांना ही रेती नागपूरमध्ये आणायची होती. तिथून ती रेती कुठे न्यायची, हे नागपूरात आल्यानंतर त्यांना सांगण्यात येणार होते. सदर आरोपी हे अकोला, नांदेड आणि वाशिम जिल्ह्यातील असल्याने रेतीची वाहतूक त्या त्या जिल्ह्यात होत असल्याची माहिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news