

भंडारा: प्रत्येक वर्षी जून महिन्यात सारस गणना घेण्यात येते. त्यानुसार यावर्षी भंडारा जिल्ह्यात घेण्यात आलेल्या सारस गणनेत एकूण ४ सारस पक्ष्यांची नोंद घेण्यात आली आहे. सदर गणना भंडारा वनविभाग व सेव इकोसिस्टम अँड टायगर (सीट) यांच्या संयुक्त प्रयत्नाने यशस्वीरित्या पार पाडली. सारस पक्षांची नोंद सातत्याने कायम राहत असल्याने पक्षीप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.
जिल्ह्याच्या भंडारा, मोहाडी व तुमसर तालुक्यातील सारस अधिवास क्षेत्रातील एकूण १८ ठिकाणी गणना १६ जून रोजी घेण्यात आली. त्यात वनकर्मचारी, सीट संस्थेचे स्वयंसेवक व ९ सारसमित्रांच्या चमूने सुनिश्चित १८ स्थळी पहाटे ५ वाजेपासून १० वाजेपर्यंत ही गणना पूर्ण केली. त्यांनतरही संभावित क्षेत्राची निहाळणी वनकर्मचारी व सारसमित्रांद्वारे करण्यात आली. त्यानुसार २०२५ च्या सारसपक्षी गणनेत भंडारा जिल्ह्यात एकूण ४ सारस पक्ष्यांची नोंद घेण्यात आली आहे.
विशेषत: सारस गणनेत पहिल्यांदा जिल्ह्यात सारसच्या दोन वेगवेगळ्या जोड्या मिळाल्या आहेत. त्यापैकी एक जोडी गोंडीटोला ते बपेरा शेतीशिवार परिसरात तर दुसरी जोडी कवलेवाडा बॅरेज नजीकच्या वांगी गावाच्या शेतीशिवार परिसरात आढळलेत.
जिल्ह्यात सारस संवर्धनासाठी जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सारस संवर्धन समिती कार्य करीत आहे. सारस गणनेचे नियोजन उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्या आदेशानुसार करण्यात आले. सदर गणना जिल्हा सारस संवर्धन समितीचे सदस्य शाहिद खान, सहाय्यक वनसंरक्षक रितेश भोंगाडे, सचिन निलख, सेवा संस्था गोंदियाचे अध्यक्ष सावन बाहेकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. गणनेच्या यशस्वीतेसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारा, तुमसर, जाम कांद्री व नाकाडोंगरीसोबत वन कर्मचारी, सारसमित्र व सीटच्या स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.
२०१७-३ (एक जोडी व एक अवयस्क)
२०१८-२ (फक्त एक जोडी)
२०१९-३ (एक जोडी व एक अवयस्क)
२०२०-२ (फक्त एक जोडी)
२०२१-२ (फक्त एक जोडी)
२०२२-३ (एक जोडी व एक अवयस्क)
२०२३-४ (एक जोडी व दोन अवयस्क)
२०२४- ४ (एक जोडी व दोन अवयस्क)