

भंडारा: १ जानेवारीच्या दुपारपासून अंगणातून बेपत्ता झालेला ४ वर्षाचा मुलगा अखेर ७० तासांच्या शोधमोहिमेनंतर जंगलात सुरक्षित सापडला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सामान्य आहे. तुमसर तालुक्यातील जंगलव्याप्त चिखला गावातील ही घटना आहे.
१ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तुमसर तालुक्यातील चिखला खाण येथील ५२ टाइप क्वार्टर कॉलनीत नील मनोज चौधरी हा ४ वर्षाचा मुलगा घराच्या अंगणात खेळत असताना गुढरित्या बेपत्ता झाला होता. त्याचे अपहरण झाले असावे किंवा वन्यप्राण्याने त्याला उचलून नेले असावे, असा अंदाज व्यक्त करीत पोलिसांसह वन विभागाने त्याची शोधमोहिम सुरू केली होती. शोधासाठी ड्रोनसह श्वानपथकाचाही वापर करण्यात आला. परंतु, नीलचा शोध लागत नव्हता. त्यामुळे प्रशासनात त्याला शोधण्याचे आव्हान होते.
गावातील नागरिकांसह वनविभाग, पोलिस विभागाकडून या बालकाचा शोध सुरू असतानाच, आज शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास नील हा जंगलातील डोंगराच्या पायथ्यावर सुस्थितीत आढळून आला आणि सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला. त्याला तात्काळ आरोग्य केंद्र गोबरवाही येथे दाखल केले. डॉ.वनश्री गिरीपुंजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालकाची प्रकृती सामान्य असून तो धोक्याबाहेर आहे. गेल्या चार दिवसांपासून नील अचानक बेपत्ता झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती. आज तो सापडल्याने संपूर्ण भागात आनंदाचे वातावरण आहे.
चार दिवसांच्या कडाक्याच्या थंडीत जंगलात नील हा कसा राहिला, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कुणीतरी नीलला टेकडीवर आणून सोडले असावे, असा संशयही नागरिकांनी व्यक्त केला आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान तो कुठे होता, कुणासोबत होता, याचा तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे. त्यानंतरच या रहस्यमय घटनेचा छडा लागू शकणार आहे.