Bhandara Accident | भंडारा-तुमसर मार्गावर बस-दुचाकी अपघात: नातेवाईकाचे अंत्यविधी करून येताना तरुण ठार; आई गंभीर जखमी

वरठीजवळील सिरसी  येथील घटना
Bhandara Tumsar Bus Bike Collision
अपघातग्रस्त एसटी बस.Pudhari
Published on: 
Updated on: 

Bhandara Tumsar Bus Bike Collision


मोहाडी: नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपून आईसोबत दुचाकीने गावाकडे परतणाऱ्या २४ वर्षीय तरुणाचा एसटी बस व दुचाकीच्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात त्याची आई गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर भंडारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दीपांशु मनोहर डोंगरे (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे. माधुरी मनोहर डोंगरे (रा. नेहरू वॉर्ड, वरठी) असे जखमी आईचे नाव आहे. ही हृदयद्रावक घटना गुरूवारी (दि. १२) सायंकाळी भंडारा-तुमसर मार्गावरील वरठी येथील सिरसी फाट्याजवळ घडली.

प्राप्त माहितीनुसार, दीपांशु हा आपल्या आई माधुरी यांच्यासोबत सिल्ली येथे नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेला होता. त्यानंतर दोघेही दुचाकीने क्रमांक एमएच ३६ एटी ०८६७ ने वरठी येथील घरी परतत होते. दरम्यान, सिरसी फाट्याजवळ आले असता समोरून येणाºया एसटी बस क्रमांक एमएच ४० वाय ५८१८ च्या प्रकाशामुळे दीपांशुचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. परिणामी, दुचाकी थेट एसटी बसवर आदळली व चाकाखाली आली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, दीपांशुचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्याची आई माधुरी गंभीर जखमी झाल्या. जखमी महिलेला तातडीने भंडारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Bhandara Tumsar Bus Bike Collision
Bhandara News : लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षांचा सश्रम कारावास!

दीपांशु हा सनफ्लॅग कारखान्यात कार्यरत होता. तरुण मुलाच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच डोंगरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून नेहरू वॉर्ड परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, वरठी पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून ठाणेदार सचिन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजय मडावी पुढील तपास करीत आहेत.

बसमधील ५० प्रवासी सुखरूप

वाराशिवणीवरून नागपूरच्या दिशेने एसटी बसमध्ये अपघाताच्या वेळी जवळपास ५० पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत होते. या भीषण धडकेत तुमसर येथील एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली असून इतर सर्व प्रवासी सुखरूप बचावले. मोठी दुर्घटना घडूनही बसमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नसल्याने दिलासा व्यक्त होत आहे.

Bhandara Tumsar Bus Bike Collision
Bhandara News | लोखंडी गेट अंगावर कोसळून चिमुरडीचा मृत्यू

अरुंद मार्गावर अपघातांचे सत्र

भंडारा-तुमसर हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असून या रस्त्यावर दिवसरात्र मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र, तुलनेने रस्ता अरुंद असल्याने वारंवार अपघात घडत आहेत. या मार्गावर वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून रस्त्याचे रुंदीकरण आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.