

भंडारा: भंडारा जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या बांधकामाला लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला असून समस्या जाणून घेण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ द्यावी अशी लेखी मागणी केल्यावरही मुख्यमंत्र्यांनी दखल न घेतल्याने अखेर पीडित शेतकऱ्यांनी लाखांदूर तालुक्यातील करांडला येथे रविवार, २ मार्चपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
लाखांदूर तालुक्यातून समृद्धी महामार्गाचे बांधकाम करण्यासाठी मार्गातील शेतकऱ्यांशी कोणत्याही वाटाघाटी न करता जमीन हस्तांतरीत करण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केला आहे. यासंदर्भात अनेकवेळा शेतकऱ्यांनी विरोध दर्शवून प्रथम शेतीचे दर तसेच अन्य मागण्यांसंदर्भात चर्चा करावी, ही मागणी केली. मात्र जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने फेब्रुवारी महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीची वेळ देऊन शेतकर्यांच्या समस्या जाणून घ्यावा, यासाठी १६ जानेवारीला लाखांदूर तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले होते. मात्र त्या निवेदनाची मुख्यमंत्र्यांनी कोणतीच दखल न घेतल्याने समृद्धी महामार्गातील पीडित शेतकरी विनोद ढोरे यांच्या नेतृत्वात प्रभु मेंढे, जयपाल भांडारकर, व्यंकट बेडेकर, जनार्दन भांडारकर, शिशुपाल भांडारकर, शीतल भांडारकर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.