

भंडारा: जिल्ह्यात शनिवारी पहाटेपासून संततधार पावसाला सुरुवात झाली. दिवसभर पावसाने मुक्काम ठोकल्याने जनजीवन प्रभावित झाले होते. वैनगंगा नदीतील जलस्तर वाढल्याने गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे अर्ध्या मिटरने उघडण्यात आले आहेत.
हवामान विभागाने शुक्रवारी पावसाचा रेड अलर्ट दिला होता. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली होती. परंतु, हा दिवस पूर्णत: कोरडा गेला. पण, शनिवार पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. संततधार पावसामुळे भंडारा ते कारधा येथील वैनगंगेवरील लहान पूल, खमारी नाला, साकोली तालुक्यातील विर्शी ते उकारा, चिंगी ते खोबा, गिरोला ते बोंडे, सराटी ते चिचगाव, नेहारवाणी ते कटनधरा, लाखनी तालुक्यातील मिरेगाव ते सोनमाळा हे मार्ग बंद करण्यात आले.
साकोली तालुक्यातील मोहघाटा येथे पावसामुळे शेळ्याचा गोठा कोसळल्याने त्यात दबून तीन शेळ्यांचा मृत्यू झाला. गोसेखुर्द धरणातून सध्या ३६५२ क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भंडारा येथील वैनगंगा नदीची पाणीपातळी इशारा पातळीच्या खाली आहे. सध्या जिल्ह्यात कुठेही पूरस्थिती नसल्याची माहिती आहे.