

भंडारा: आयुध निर्माणीतील चार्जमन पदाच्या पदोन्नतीसाठी २०२३-२४ मध्ये झालेल्या विभागीय परीक्षेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पात्र असूनही परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकलेल्या कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान कार्यालय, संरक्षण विभाग आणि पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर याचा तपास करत असताना नागपूर पोलिसांनी भंडारा येथील आयुध निर्माणीतील दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. तर दोन जण फरार आहेत. याप्रकरणी नागपुरातील बुट्टीबोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२०२३-२४ मध्ये देशातील ४१ आयुध निर्माणीत चार्जमन पदासाठी विभागीय स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आणि पदोन्नती मिळवण्यासाठी ५ ते ८ लाख रुपये घेतल्याची माहिती आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर भंडारा, अंबाझरी, चांदा येथील आयुध निर्माणी कारखान्यांमध्ये सुमारे १०० चार्जमन नियुक्त करण्यात आले. पैसे भरून परीक्षा उत्तीर्ण झालेले कर्मचारी या पदासाठी पात्र नसल्याचा आरोप होत आहे. अशा स्थितीत आयुध निर्माणीत अपात्र कर्मचाऱ्यांना कामावर लावले तर मोठी घटना घडू शकते. परीक्षा दिलेल्या परंतु अनियमिततेमुळे परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलेल्या काही पात्र कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान कार्यालय, संरक्षण मंत्रालय आणि बुट्टीबोरी पोलिसांकडे तक्रारी केल्या. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. त्यानंतर नागपूरचे सहायक पोलिस अधीक्षक दीपक अग्रवाल यांच्या पथकाने १९ फेब्रुवारीला भंडारा आयुध निर्माणी गाठून तपास सुरू केला.
१९ फेब्रुवारी रोजी नागपूर पोलिसांनी आयुध निर्माणी भंडारा गाठून विभागीय स्पर्धा परीक्षेत निवड झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी मागवली. यातील सुमारे ३० नियुक्त कर्मचाऱ्यांपैकी पोलिस दररोज दोन ते तीन कर्मचार्यांना चौकशीसाठी बोलावत आहेत. या प्रकाराची आयुध निर्माणीमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.