

भंडारा : जवाहरनगर येथील आयुध निर्माणीत २४ जानेवारी रोजी झालेल्या भीषण स्फोटात ८ कामगारांचा मृत्यू झाला होता. तर ५ कामगार गंभीररित्या जखमी झाले होते. जखमी कामगारांवर नागपूर येथे उपचार सुरू होते. यातील जयदीप बॅनर्जी ( वय ४२) या कर्मचाऱ्याचा आज शुक्रवारी (दि.२८) रोजी दुपारच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याची संख्या ९ वर पोहोचली आहे.
जवाहरनगर येथील आयुध निर्माणीत संरक्षण विभागासाठी आरडीएक्स हे विस्फोटक तयार केले जाते. २४ जानेवारी रोजी सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास आयुध निर्माणीतील टी २३ एलटीपी (लो टेम्परेचर प्लास्टिक एक्सपोजर) या इमारतीत १३ कर्मचाऱ्यांची शिफ्ट होती. सदर कर्मचारी आपल्या कामात व्यस्त असताना अचानक भीषण स्फोट झाला होता. हा स्फोट इतका तीव्र होता की, परिसरातील गावांना हादरा बसला. भंडारा शहरापर्यंत या स्फोटाचे हादरे जाणवले.
आयुध निर्माणीचे अधिकारी, एसडीआरएफ, एनडीआरएफ, नागपूर महापालिकेची टिम तथा भंडारा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत बचाव कार्याला सुरुवात केली होती. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. या स्फोटात ८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर ५ कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले होते. जखमींवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज शुक्रवारी (दि. २८) रोजी जयदीप बॅनर्जी या कर्मचऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या स्फोटात एकूण ५ कर्मचारी जखमी झाले होते. त्यांना नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील तीन कामगारांना सुट्टी देण्यात आली होती. तर अन्य दोन कामगार उपचार घेत होते. आज जयदीप बॅनर्जी या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर अन्य एका कर्मचाऱ्यावर उपचार सुरू आहेत.