Bhandara News | चालत्या रेल्वेच्या दारातून थुंकण्यासाठी डोके बाहेर काढले, थेट खांबाला धडकले: तुमसर रोड स्थानकावर तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

भंडारा येथील घटना : नियमांचे पालन न करणे बेतू शकते जिवावर
AI Genreted Image
AI Genreted Image
Published on: 
Updated on: 

भंडारा : गोंदियावरून नागपूरकडे जाणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका तरुणाचा चालत्या गाडीतून थुंकण्यासाठी दारातून डोके बाहेर काढल्यानंतर रेल्वे लाईनच्या विद्युत पोलवर आदळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. २२) सकाळी ९.२० वाजताच्या सुमारास तुमसर रोड रेल्वे स्थानकावर घडली.

​मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण महाराष्ट्र एक्सप्रेसने गोंदियाहून नागपूरच्या दिशेने प्रवास करीत होता. गाडी तुमसर रोड रेल्वे स्थानकावर येत असताना या तरुणाने थुंकण्याकरिता रेल्वेच्या दारातून डोके बाहेर काढले. याच दरम्यान त्याचे डोके रेल्वे लाईनजवळील विद्युत पोलवर जोरदार आदळले आणि तो गाडीखाली पडला.

​या अपघातात तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानकावरील रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ॲम्बुलन्सच्या मदतीने त्याला उपचारासाठी तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

​दरम्यान, चालत्या रेल्वे गाडीच्या दारात उभे राहून किंवा बाहेर डोके काढून प्रवास करणे किती धोकादायक ठरू शकते, याचे या घटनेतून पुन्हा एकदा भीषण वास्तव समोर आले आहे. या प्रकरणी पुढील तपास रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.