Bhandara News : 12 वीत नापास.. माजी उपसरपंचांच्या मुलाचा शेतात गळफास! भंडा-यातील विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल

तुमसर तालुक्यातील रोंघा येथील दुर्दैवी घटना
Bhandara News : 12 वीत नापास.. माजी उपसरपंचांच्या मुलाचा शेतात गळफास! भंडा-यातील विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल
Published on
Updated on

भंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. तुमसर तालुक्यातील रोंघा येथील १८ वर्षीय विद्यार्थ्याने परीक्षेत अपयश आल्याने मानसिक तणावातून गळफास लावून जीवन संपविल्याची घटना समोर आली आहे. नवल होलाराम खंडाते असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवल हा बारावीचा विद्यार्थी होता. शनिवारी (दि. २) बारावीचा निकाल जाहीर झाला, मात्र त्यात त्याला यश मिळू शकले नाही. निकाल पाहिल्यापासूनच तो प्रचंड अस्वस्थ आणि मानसिक तणावात होता. याच नैराश्यातून त्याने गावाजवळील एका शेतात जाऊन तेथील करंजच्या झाडाला गळफास लावून जीवन संपविले.

मृत नवलचे वडील गावाचे माजी उपसरपंच आहेत. त्याच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. ऐन उमेदीच्या काळात मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याने खंडाते कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

गोबरवाही पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ठाणेदार शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिस हवालदार गणेश बांते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. परीक्षेत अपयश आल्याने विद्यार्थ्यांनी खचून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news