

वरठी (भंडारा) : येथील आदित्य लॉनसमोर सोमवारी (दि. ५) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास एका भरधाव रेतीवाहू टिप्परने दुचाकीला चिरडल्याची भीषण घटना घडली. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा टिप्परच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला. नीलेश शेंडे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नीलेश शेंडे हा आपल्या दुचाकीने (क्र. एमएच 36 एएन 2229) प्रवास करत असताना विरुद्ध दिशेने अत्यंत भरधाव वेगाने येणाऱ्या रेतीवाहू टिप्परने (क्र. एमएच 40 डीसी 3577) त्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, नीलेश थेट टिप्परच्या मागील चाकाखाली आला आणि त्यातच त्याचा चिरडून जागीच प्राण गेला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, तर काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.
वरठी आणि लगतच्या परिसरातून होणारी अनियंत्रित रेती वाहतूक आता नागरिकांच्या जीवावर उठली आहे. ‘हे टिप्पर चालक कोणत्याही नियमांचे पालन करत नाहीत. अत्यंत वेगाने आणि बेदरकारपणे ही वाहने चालवली जातात,’ असा संतप्त आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. आजच्या अपघाताने एका उमद्या तरुणाचा बळी घेतल्याने पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच वरठी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त टिप्पर आणि दुचाकी ताब्यात घेतली असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे.
वारंवार होणारे हे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी भरधाव रेती वाहतुकीवर तातडीने निर्बंध घालावेत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी आता वरठीवासीयांकडून केली जात आहे.