

भंडारा : तालुक्यातील पिंपळगाव/को. येथे बुधवारी (दि. ४) रात्री एका अस्वलाने चक्क घरात शिरकाव केल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली. जीवाच्या आकांताने ओरडणाऱ्या ग्रामस्थांच्या मदतीला वन विभाग धावून आले आणि मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास या अस्वलाला जेरबंद करून सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव/को. परिसरात वन्यजीवांचा वावर वाढला आहे. बुधवारी रात्री गावातील इंदुबाई बारसागडे यांच्या घरात अचानक एक अस्वल शिरले. घरात अस्वल पाहताच इंदुबाईंची घाबरगुंडी उडाली. त्यांनी तातडीने आरडाओरड करून गावकऱ्यांना सावध केले. काही वेळातच अस्वलाच्या बातमीने संपूर्ण गाव गोळा झाले.
घटनेचे गांभीर्य ओळखून गावकऱ्यांनी वन विभागाला पाचारण केले. उपवनसंरक्षक योंगेंद्र सिंह आणि सहाय्यक वनसंरक्षक संजय मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या पथकाने तातडीने धाव घेतली. अस्वलाला पकडण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी घराभोवती वेढा घातला. सुमारे चार-पाच तासांच्या थरारानंतर, रात्री १२:३० वाजता अस्वलाला पिंजऱ्यात कैद करण्यात यश आले. जेरबंद केल्यानंतर अस्वलाची तपासणी करून त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडून देण्यात आले.
ही यशस्वी कारवाई लाखांदूर वनपरिक्षेत्र अधिकारी पी.बी. चन्ने, वनरक्षक पावले, जारवाल, शुभम मोदनकर, शशांक तुरस्कर, अविनाश नागपुरे, अमोल नागरीकर, निशी वानखेडे, नरेंद्र उरकुडकर यांच्यासह चालक उमेश वाधीवे, नामदेव मेश्राम आणि अन्य कर्मचाऱ्यांनी पार पाडली.
अस्वलाला जेरबंद केल्याने तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी गावात वन्यजीवांचा वावर वाढल्याने वन विभागाने या परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.