Bhandara News : गोसेखुर्दमधून भागणार चार जिल्ह्यांची तहान! जून २०२७ पर्यंत पाणीसाठवणुकीचे नियोजन

नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीसाठी वैनगंगेत पाणी साठवणूक, धरणाचे वक्रद्वारे बंद करुन पाणी साठवणुकीला सुरुवात
 पाणीपातळी वाढल्याने वैनगंगेवरील लहान पुलाला पाणी टेकले आहे. 
पाणीपातळी वाढल्याने वैनगंगेवरील लहान पुलाला पाणी टेकले आहे. 
Published on: 
Updated on: 

Maharashtra water resources भंडारा : एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात अपुरा पाऊस पडल्याने सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पुढील काळात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने भंडारा जिल्हा प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना सुरू केल्या आहेत. भंडारासह नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी गोसेखुर्द धरणाचे वक्रद्वारे बंद करुन पाणी साठवणुकीला सुरुवात झाली आहे.  

भंडारा जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा सुमारे २५ टक्के कमी पाऊस झाला. हीच स्थिती पूर्व विदर्भात आहे. पावसाअभावी नदी आणि जलाशयांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. पावसाळ्याचा हंगाम आता संपल्यागत असल्याने पुढील पावसासाठी जून २०२७ पर्यंत वाट बघावी लागणार आहे. तोपर्यंत पाण्याची तहान भागविण्यासाठी राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात येत आहे.

शनिवारी, कारधा येथील वैनगंगा नदीची पाणीपातळी २४५.३१ मीटर नोंदविण्यात आली. ही पाणीपातळी धोक्याच्या इशाºयाच्या वर आहे. सध्या नदीची पातळी वाढलेली असून पाणी नदीकाठाबाहेरून वाहत आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, हे पाणी गोसेखुर्द प्रकल्पासाठी संपादित केलेल्या २४५ मीटरवरील क्षेत्रापर्यंत गेले आहे. मुख्यत: पवनी तालुक्यातील वैनगंगेच्या काठावरील गावांलगत हे पाणी पोहोचले आहे. पाणीपातळी आणखी वाढल्यास पुराचा धोका टाळण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडून आवश्यकतेनुसार पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.

गोसेखुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प असून भंडारा, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर हे प्रकल्पाचे लाभक्षेत्र आहेत. त्यामुळे या चारही जिल्ह्यांसाठी प्रकल्पाचे पाणी राखीव ठेवण्याच्या दृष्टीने पाण्याची साठवणूक केली जात आहे. तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाºया भंडारा जिल्ह्यात यंदा जलसाठ्यांची स्थिती चिंताजनक आहे. गेल्या काही वर्षांत भूजल पातळीत घट झाल्याने काही भागांतील बोअरवेलच्या पाणीपातळीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पाण्याचा अनावश्यक अपव्यय टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बहुतांश पाणीपुरवठा योजना वैनगंगेवरच
वैनगंगा नदी भंडारा, तुमसर, लाखांदूर आणि पवनी तालुक्यांतून वाहते. जिल्ह्यातील बहुतांश पाणीपुरवठा योजना याच नदीवर अवलंबून आहेत. भंडारासह गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातीलही काही पाणीपुरवठा योजना या पाण्यावर आधारीत आहेत. त्यामुळे जून २०२७ पर्यंत पाणीटंचाई टाळण्यासाठी पाण्याची साठवणूक केली जात आहे. उपलब्ध पाणीसाठा जास्तीत जास्त काळ टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे.

बावनथडीचा साठा केवळ १३ टक्के
चार महिन्यांचा मान्सून हंगाम संपत असताना बावनथडी प्रकल्पात केवळ १३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील अन्य प्रकल्प व तलावांची स्थितीही समाधानकारक नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या तसेच घरगुती वापराच्या पाण्याची मागणी वाढल्यास उपलब्ध जलसाठ्यावर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.

वैनगंगा नदीतील पाणीपातळीवर प्रशासनाकडून दर तासाला निरीक्षण केले जात आहे. पाणीपातळी निर्धारित मर्यादेपेक्षा वाढल्यास धरणाचे दरवाजे उघडून आवश्यकतेनुसार पाण्याचा विसर्ग केला जाईल. उपलब्ध पाणीसाठा जून २०२७ पर्यंत टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाणीपुरवठा योजना वर्षभर सुरळीत सुरू राहाव्यात, हा या नियोजनामागील उद्देश आहे.

— अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, भंडारा.

logo
Pudhari News
pudhari.news