Bhandara News : भंडाऱ्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना, शेतात विजेचा झटका बसून पित्याचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

भंडारा जिल्ह्यातील ताडगाव येथील घटना
bhandara electric shock accident
pudhari photo
Published on
Updated on

भंडारा : मोहाडी तालुक्यातील ताडगाव येथे शेतात तुटून पडलेल्या जिवंत विद्युत वाहिनीचा जोरदार धक्का लागून एका ६५ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांचा ३३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. महावितरणच्या जीर्ण झालेल्या वाहिन्यांमुळे आणि निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचा संतापजनक आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून केला जात आहे.

गणेश केशव गिरी (वय ६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, दुर्गेश गणेश गिरी (वय ३३) असे जखमी मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश गिरी आणि त्यांचा मुलगा दुर्गेश हे दोघे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात पिकांना खत देण्यासाठी गेले होते. मात्र, शेतात वीज वितरण कंपनीची उच्च दाबाची वीज वाहिनी आधीच तुटून जमिनीवर पडली होती. कामाच्या गडबडीत असताना दोघांचाही अनावधानाने या जिवंत तारेला स्पर्श झाला. विजेचा जोरदार धक्का बसल्याने गणेश गिरी यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला, तर मुलगा दुर्गेश गंभीर भाजल्याने जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच आंधळगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. परिसरातील जीर्ण वीज वाहिन्यांची वेळेवर देखभाल-दुरुस्ती न केल्यामुळेच या शेतकऱ्याचा बळी गेल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि बाधित शेतकरी कुटुंबाला तातडीने आर्थिक भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news