

भंडारा : दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीसमोर मोठे संकट निर्माण झाल्याने नैराश्यातून मोहाडी तालुक्यातील धोप येथील शेतकरी राजेंद्र अमर सपाटे यांनी विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपविल्याची घटना गुरुवारी (दि. ८) उघडकीस आली. विशेष म्हणजे, या घटनेच्या अवघ्या पाच दिवसांपूर्वीच पालकमंत्री पंकज भोयर यांनी धोप येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी सपाटे यांनी पालकमंत्र्यांसमोर आपली कैफियत मांडली होती.
राजेंद्र सपाटे यांच्याकडे सात एकर सामूहिक शेती होती. त्यांच्या शेतीला मोहाडी तालुक्यातील सोरणा मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा होत होता; मात्र यंदा हा प्रकल्प कोरडा पडल्याने सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. त्यातच मागील वर्षी वीज कोसळून त्यांच्या दुभत्या म्हशी मृत्युमुखी पडल्या होत्या. या नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नसल्याचे सांगण्यात येते. यंदा पावसाची कमतरता आणि सिंचनाचा अभाव यामुळे धानपीकही धोक्यात आले होते.
राज्य शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांची घोषणा करताना भंडारा जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश केला आहे; मात्र मोहाडी आणि तुमसर तालुक्यांचा त्यात समावेश नसल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी कायम आहेत. ३ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री पंकज भोयर यांनी मोहाडी तालुक्यातील हिवरा, जाम, कांद्री या गावांसह धोप येथे भेट देऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी राजेंद्र सपाटे यांनी डोळ्यांत अश्रू आणून आपल्या समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या होत्या. त्यानंतर अवघ्या पाचच दिवसांत त्यांनी जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली.
ही घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष पाहायला मिळाला. पालकमंत्र्यांसमोर कैफियत मांडूनही कोणतीच दखल घेतली न गेल्याने शेतकरी आक्रमक झाले. घटनेची माहिती मिळताच अप्पर जिल्हाधिकारी जाधव, उपविभागीय अधिकारी दिघे, मोहाडीच्या तहसीलदार प्राजक्ता बुरांडे व अन्य अधिकाऱ्यांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार चरण वाघमारे यांनीही घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. सपाटे कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. पालकमंत्र्यांनी सकारात्मक कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर राजेंद्र सपाटे यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
पालकमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान राजेंद्र सपाटे यांनी मांडलेल्या प्रश्नांवर प्रशासनाने नेमकी कोणती कारवाई केली, याचा तपशील पुढे येणे आवश्यक आहे. जीव जाईपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील, तर हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत माजी आमदार चरण वाघमारे यांनी व्यक्त केले. तसेच दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मोहाडी व तुमसर तालुक्यांचा तातडीने समावेश करून संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.