

भंडारा : साकोली तालुक्यातील तलाव वॉर्ड परिसरात मंगळवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली. स्वतःच्या शेतातील मका पिकाला लागलेली भीषण आग विझवण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. रामदास गोखलू निंबेकर (वय ६५, रा. तलाव वॉर्ड, साकोली) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या आगीत निंबेकर यांच्यासह शेजारील शेतकऱ्याचेही लाखोंचे मका पीक जळून खाक झाले असून परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
साकोली येथील गट क्रमांक ५२८ मधील ५६ आर क्षेत्रात रामदास निंबेकर यांनी मका पिकाची लागवड केली होती. मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास त्यांच्या शेताला अचानक आग लागली. वाळलेले पीक आणि वाढत्या उष्णतेमुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. आपल्या कष्टाचे पीक डोळ्यांदेखत जळत असल्याचे पाहून निंबेकर यांनी स्वतःची पर्वा न करता आग विझवण्यासाठी शेताकडे धाव घेतली. मात्र, आगीच्या प्रचंड ज्वालांमुळे ते स्वतःच आगीच्या विळख्यात अडकले आणि गंभीररीत्या भाजल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच अंत झाला. शेतात अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली.
या भीषण आगीमध्ये रामदास निंबेकर यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे ५६ आर क्षेत्रातील मका पीक पूर्णपणे जळून राख झाले. ही आग एवढी भयानक होती की, ती लगतच्या शेतातही पसरली. शेजारील शेतकरी हरिचंद्र कापगते यांच्या १.३८ हेक्टर क्षेत्रातील मका पिकालाही या आगीने वेढले. या आगीत कापगते यांचेही सुमारे तीन लाख रुपयांचे पीक जळून खाक झाले आहे. या एकाच दुर्घटनेत दोन्ही शेतकऱ्यांचे मिळून सुमारे साडेचार लाख रुपयांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच साकोली पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून रामदास निंबेकर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. साकोली पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू साळवे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण तलाव वॉर्ड परिसरात मातमी कळा पसरली असून शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. शासनाने आणि प्रशासनाने संवेदनशील भूमिका घेऊन पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मंजूर करावी, अशी मागणी माजी नगरसेवक मनीष कापगते, नगरसेवक सपन कापगते, माजी नगरसेवक हेमंत भारद्वाज यांच्यासह स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.