

भंडारा : भंडारा वनविभागांतर्गत येणाऱ्या अड्याळ वनपरिक्षेत्रातील पिलांद्री परिसरात मृत वाघ शावक आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज दि. 25 मे 2026 रोजी सकाळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना नियमित गस्ती दरम्यान ही बाब निदर्शनास आली. पिलांद्री कक्ष क्रमांक 302 आरएफ परिसरातील पाणवठ्यावर वन्यप्राणी वाघाचे अस्तित्व आढळल्याने वन विभागाने तत्काळ शोधमोहीम सुरू केली.
माहितीनुसार, वनरक्षक आणि वन्यजीव पथक परिसराची पाहणी करीत असताना एका नर वाघाचे दर्शन झाले. याच परिसरात जवळपास 100 मीटर अंतरावर वाघाचे शावक मृत अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी आणि पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
अधिकाऱ्यांनी तातडीने परिस्थितीचा आढावा घेत मृत शावक सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले. त्यानंतर शावकाला पुढील तपासणीसाठी भिवखिडकी येथील रोपवाटिकेत नेण्यात आले. प्राथमिक पशुवैद्यकीय तपासणीत मृत शावक अंदाजे दीड ते दोन महिन्यांचे असल्याचे समोर आले. तसेच शावकाच्या शरीरावरील सर्व अवयव सुरक्षित अवस्थेत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक निष्कर्षात नर आणि मादी वाघांमध्ये क्षेत्रीय संघर्ष सुरू असताना शावकाचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी शावकाचे नमुने न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. संपूर्ण कारवाई वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, पशुवैद्यकीय तज्ज्ञ, वन कर्मचारी, व्याघ्र संरक्षण पथक आणि स्वयंसेवक यांच्या उपस्थितीत पार पडली. या घटनेमुळे परिसरात वन्यजीवांच्या हालचालीबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू असून वनविभागाकडून सतर्कता वाढविण्यात आली आहे.