भंडारा: मोहाडी तालुक्यातील मांडेसर येथे साहित्य कीट वाटपावरून दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. याचे पडसाद संपूर्ण तालुक्यात उमटले. दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे.
सायंकाळच्या सहा वाजताच्या सुमारास मांडेसर येथे एका पिशवीत सोनपापडी, नमकीन, मनुका, टिफिन डब्बा, बिस्कीट पॉकेट आदी साहित्याचे वाटप नितीन सव्वालाखे, रोशन लिल्हारे, रवी बिसने, ईश्वर लिल्हारे यांच्याद्वारे सुरू होते. भरारी पथकाचे अरविंद तिरपुडे यांना याबाबतची माहिती होताच त्यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केली. तसेच मांडेसर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते व तक्रारकर्ते अशोक मुटकुरे यांनी साहित्य वाटपाला विरोध केला. त्यामुळे अजित पवार पक्षाचे कार्यकर्ते रोशन लिल्हारे, रवींद्र लिल्लारे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ता अशोक मुटकुरे यांच्यात हाणामारी झाली.
या घटनेची माहिती दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना होताच मोहाडी पोलिस स्टेशन गाठले. मोहाडी पोलिस स्टेशनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नेते जमा झाले. त्यामुळे मोहाडी पोलिस स्टेशनच्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांची एकमेकांना बघून घेण्याची धमकी देणे तसेच गैरकायदेशीर जमाव केला. आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार चरण वाघमारे, विजय भुरे, सभापती नंदू रहांगडाले, अमित रंगारी, डॉ. शांताराम चापले, रोशन लांजेवार व त्यांचे ७०हून अधिक कार्यकर्त्याविरुद्ध तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विजय कारेमोरे, सभापती रितेश वासनिक, सचिन गायधने, ज्योतिष्य नंदनवार, अनिल मांढरे, कोमल गजभिये, गुलाब सव्वालाखे यासह सुमारे ७० ते ७५ हून अधिक कार्यकर्त्यांविरुद्ध आचारसंहितेचे उल्लंघन व पोलिस स्टेशनमध्ये घोषणाबाजी व गोंधळ केल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले.
भरारी पथकाच्या प्रमुखांनी तक्रारकर्त्याचे नाव उघड केल्यामुळे दोन गटात हाणामारी झाली. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आक्रोश दिसून आला. त्यामुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. रात्रीच्या दहा वाजतापर्यंत पोलिस स्टेशन बाहेर कार्यकर्त्यांचा जमाव होता.