Bhandara ATS raid | भंडाऱ्यात एटीएसची चौकशी, संशयावरून एकाला घेतले ताब्यात

भंडारा शहरातील मोठाबाजार परिसरात कारवाई,
ATS Raid
FIle PhotoPudhari
Published on
Updated on

भंडारा :  भंडारा शहरातील मोठाबाजार परिसरात नागपूर दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असल्याच्या संशयावरून शहरातील एका मोबाईल शॉपमधील कर्मचाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे शहरात काही काळ चर्चेचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण एका मोबाईल विक्रीच्या दुकानात काम करतो. हा तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून काही संशयास्पद व्यक्तींच्या संपर्कात असल्याचा संशय एटीएसला होता. त्या आधारे एटीएसच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने दुकानावर धाड टाकून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याचा मोबाईल संच देखील तपासणीसाठी जप्त करण्यात आला.

संशयित तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी गँगस्टर आणि मुंबईतील काही गुन्हेगारी टोळ्यांच्या संपर्कात असल्याची प्राथमिक चर्चा असली, तरी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे याची सत्यता तपासली जात आहे. राज्यातील विविध भागांत एटीएसकडून अशा प्रकारची नियमित तपासणी मोहीम राबवली जाते, त्याचाच हा एक भाग असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

पोलिसांची भूमिका आणि गुप्तता

 या कारवाईबाबत पोलीस प्रशासनाने अत्यंत गोपनियता पाळली आहे. भंडारा पोलिस विभागाकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. दरम्यान, संबंधित तरुणाला पोलिस ठाण्यात नेऊन प्राथमिक चौकशी करण्यात आली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही एक नियमित चौकशी प्रक्रिया असून चौकशीनंतर संबंधित तरुणाला सोडून देण्यात आले आहे. या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याचे सांगितले. नागपूर एटीएसच्या पथकाने ही कारवाई केल्यामुळे आणि प्रकरणाचे स्वरूप संवेदनशील असल्याने संबंधिताचे नाव उघड करण्यात आलेले नाही. तपासात नेमके काय निष्पन्न झाले, याबाबत प्रशासकीय स्तरावर मौन बाळगण्यात आले आहे. अशा प्रकारच्या कारवाईमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्याचे दिसून येत असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news