भंडारा: मंडळ अधिकारी परीक्षेत मास कॉपी ?

Mass Cheating in Exam| प्रामाणिकांवर अन्याय झाल्याचा सूर
 मंडळ अधिकारी परीक्षेत मास कॉपी ?
मंडळ अधिकारी परीक्षेत मास कॉपी ? ( Image Source AI )
Published on
Updated on

भंडारा: भंडारा जिल्ह्यातील महसूल विभागातील तलाठी संवर्गातून मंडळ अधिकारी पदासाठी विभागीय परीक्षा सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस भंडारा येथे पार पडल्या. या परीक्षेत परीक्षार्थी तलाठी चक्क मोबाईल सोबत ठेवून होते. मोबाईलच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका सोडविण्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे प्रमाणिकपणे परीक्षा देणाऱ्या तलाठ्यांवर अन्याय असून मुख्यमंत्र्यांसह, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्याचा इशारा या तलाठ्यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील सुमारे ७० तलाठ्यांची परीक्षा सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी भंडारा येथील गांधी विद्यालयात घेण्यात आल्या. दोन दिवसात दोन सत्रात चार पेपर घेण्यात आले. ‘महसूल बाबी’ यावर प्रश्न आधारित होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेच्या पहिल्या दिवशी सोमवारी पेपर सुरू असताना सुरुवातीचे दोन तास सुरळीत परीक्षा पार पडली. त्यानंतर कॉपीसाठी मूभा देण्यात आली. हाच प्रकार मंगळवारीही घडला. परीक्षार्थी मोबाईल सोबत घेऊन पेपर सोडवित होते.

भंडारा जिल्ह्यातील तलाठ्यांची ठराविक सेवेनंतर मंडळ अधिकारी पदावर पदोन्नती केली जाते. त्यासाठी त्यांना तलाठी असताना विभागीय परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर पदोन्नतीचा कालावधी जवळ आल्यास अशा तलाठ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते. त्यामुळे या परीक्षेत अधिकाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याची स्पर्धा तलाठ्यांमध्ये असते.

माहितीनुसार, लवकरात लवकर मंडळ अधिकारी म्हणून पदोन्नती मिळविण्यासाठी काही तलाठ्यांनी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी वरिष्ठांशी संधान साधले होते. हाच प्रकार मागीलवर्षीही झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. या प्रकारामुळे, जे तलाठी प्रामाणिक अभ्यास करतात परंतु, पैसे न दिल्याने परीक्षेत मागे पडतात. परिणामी, त्यांना मंडळ अधिकारी पदाची पदोन्नती मिळण्यात अनेक वर्षे तलाठी म्हणून घालवावी लागतात. हा आमच्यावर अन्याय असल्याचा सूर या तलाठ्यांकडून व्यक्त होत आहे. जिल्हाधिकाºयांनी या गंभीर प्रकरणाकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

अन्य अधिकाऱ्यांनी करावी पेपर तपासणी

तलाठ्यांचे मंडळ अधिकारी पदाच्या विभागीय परीक्षेचे पेपर जिल्ह्यातीलच वरिष्ठ अधिकारी तपासतात. या परीक्षेचा निकाल जाहीर होण्यासाठी महिना, दोन महिने लागतात. त्यावरही या तलाठ्यांनी शंका उपस्थित केली असून सदर पेपर दुसऱ्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी सोपविण्यात यावे. जेणेकरुन परीक्षेत पारदर्शकता राहील, असे तलाठ्यांचे म्हणणे आहे.

भरारी पथक का नाही?

कोणतीही स्पर्धा किंवा बोर्डाची परीक्षा घेण्यासाठी परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक, पोलिस बंदोबस्त, बैठे पथक आणि भरारी पथक अशी व्यवस्था असते. परंतू, मंडळ अधिकारी पदाच्या परीक्षेत अशी कोणतीही व्यवस्था नसल्याचे परीक्षा केंद्रावर दिसून आले. महसूल व्यवस्थेत पायाभूत भूमिका बजावणाऱ्या मंडळ अधिकारी पदाच्या परीक्षेत अशी बेफिकरी का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

मंडळ अधिकारी पदाच्या परीक्षेत नायब तहसीलदार हे पर्यवेक्षक म्हणून हजर होते. परंतु, परीक्षा केंद्रात मोबाईलचा वापर झाला नाही. परीक्षा सुरळीत पार पडली.

- स्मिता बेलपत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी, भंडारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news