

भंडारा: भंडारा जिल्ह्यात पावसाने पुन्हा झोडपून काढले. शेतात उभे असलेले धान आडवे पडले तर कापलेल्या कडपा पाण्यात भिजल्या. या अस्मानी संकटामुळे शेतकरी हादरुन गेला आहे. पुढचे आठ दिवस पाऊस असल्याने शेतकरी संकटात आले आहेत.
खरीप हंगामाच्या प्रारंभापासून तर शेवटच्या टप्प्यापर्यंत पावसाने प्रचंड धक्का देत शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहे. हलक्या व मध्यम धानाची कापणी, बांधणी धडाक्यात सुरू असताना पावसामुळे होत्याचे नव्हते केले आहे.
हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने धान कापण्यास सुरुवात केली. सध्या धानाच्या कडपा शेतात पडून आहेत. या कडपांची विल्हेवाट लावण्यापूर्वीच पावसाचे आगमन झाल्याने कडपा पाण्यात भिजल्या आहेत. या कडपा पुन्हा सुकविण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. पावसाचा फटका धानाच्या गुणवत्तेवर होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे कापणी योग्य धान शेतातच आडवे पडले. कडपा अंकुरण्याची शक्यता दाट आहे.