Bhandara News | इंडियन स्पॉट-बिल्ड डक, इंडियन कॉर्मोरंट, लिटल एग्रेट यासह ६१ पक्षीप्रजातींची गोसेखुर्द धरण परिसरात नोंद!

‘सीट’च्या मान्सून बर्ड वॉक सर्वेक्षणात १७ घरट्यांचाही शोध; पाणथळ, वनक्षेत्र आणि झुडपी अधिवास पक्ष्यांसाठी अनुकूल
६१ पक्षीप्रजातींची गोसेखुर्द धरण परिसरात नोंद!
६१ पक्षीप्रजातींची गोसेखुर्द धरण परिसरात नोंद!
Published on
Updated on

भंडारा: गोसेखुर्द धरण परिसरातील समृद्ध जैवविविधतेचे दर्शन मान्सून बर्ड वॉक सर्वेक्षणातून घडले. ‘सेव्ह इकोसिस्टम अँड टायगर’च्या वतीने आयोजित या सर्वेक्षणात गोसेखुर्द धरणाच्या उजव्या बाजूचा परिसर तसेच उमरेड-पवनी-करांडला वन्यजीव अभयारण्याच्या लगतच्या क्षेत्रात पक्षी निरीक्षण करण्यात आले. दोन चमूंच्या माध्यमातून झालेल्या या पाहणीत तब्बल ६१ पक्षीप्रजातींची नोंद झाली असून १७ घरटी आढळून आली.

सर्वेक्षणादरम्यान वैनगंगा नदीकाठचा पाणथळ परिसर, गावठाण, झुडपी क्षेत्र आणि जंगलातील अधिवास यांचा अभ्यास करण्यात आला. गोसेखुर्द धरणालगतचे पाणथळ क्षेत्र, वनस्पतींचे दाट आच्छादन आणि वनक्षेत्र पक्ष्यांसाठी पोषक अधिवास ठरत असल्याचे निरीक्षणातून स्पष्ट झाले.

या पक्ष्यांची झाली नोंद

सर्वेक्षणात इंडियन स्पॉट-बिल्ड डक, लेसर व्हिसलिंग डक, लिटल कॉर्मोरंट, इंडियन कॉर्मोरंट, ग्रेट कॉर्मोरंट, लिटल एग्रेट, ग्रेट एग्रेट, ग्रे हेरॉन, पर्पल हेरॉन, व्हाइट-ब्रेस्टेड वॉटरहेन, रिव्हर टर्न आणि पेंटेड स्टॉर्क यांसारख्या पाणथळ अधिवासाशी संबंधित पक्ष्यांची नोंद झाली. याशिवाय व्हाइट-थ्रोटेड किंगफिशर, कॉमन किंगफिशर, पाइड किंगफिशर, इंडियन रोलर, ब्लॅक ड्रोंगो, इंडियन गोल्डन ओरिओल, शिख्रा, पर्पल सनबर्ड, एशियन ग्रीन बी-ईटर, बाया विव्हर आणि इंडियन पॅराडाइज फ्लायकॅचर यांसह विविध प्रजाती आढळल्या.


पक्षी निरीक्षणासोबतच पक्ष्यांच्या घरट्यांचेही सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये फ्लायकॅचरची २, रेड- व्हेंटेड बुलबुलची ३ आणि बाया विव्हरची १२ घरटी आढळली. सर्वेक्षणादरम्यान आढळलेल्या पक्ष्यांची नोंद ई-बर्ड या आॅनलाइन पक्षी निरीक्षण व्यासपीठावर करण्यात आली. पक्ष्यांसोबतच त्यांच्या अधिवासाची स्थिती, घरटी, वनस्पती आच्छादन, पाणथळ क्षेत्र आणि परिसरातील अन्य जैवविविधतेचीही नोंद घेण्यात आली.

या सर्वेक्षणासाठी पक्षी अभ्यासक राजकमल जोब, मानद वन्यजीव रक्षक शाहिद खान तसेच फ्लायकॅचर्स वाइल्ड फ्रेंड्स, पवनीचे आदित्य उमाटे, वैभव देशमुख, स्नेहा चांदेवार, अभिजीत नागपुरे आणि रुद्रांश समर्थ सहभागी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news