

भंडारा : शेतात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना रविवारी (दि.३०) लाखांदूर तालुक्यातील खैरी (पट) गावातील शेतशिवरात सांयकाळी पाचच्या सुमारास घडली. डकराम गोपीचंद देशमुख ( वय ४३, राह. खैरी / पट) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
लाखांदूर तालुक्यातील खैरी/ पट, डांभे विरली, विहीरगाव व टेंभरी या गावांमध्ये मागील २० ते २५ दिवसापासून वाघाचे दर्शन होत आहे. रविवारी डकाराम देशमुख हे आपल्या शेतात मोटर पंपाची पाईप बदलवण्यासाठी सायंकाळी पाचच्या सुमारास गेले होते. यावेळी तेथे दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. व ३० ते ३५ फूट अंतरापर्यंत शेतात त्यांना ओढत नेत त्यांना ठार केले. रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. शोध घेऊनही ते मिळून न आल्याने नातेवाईकांनी लाखांदूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर रविवारी मध्यरात्री कुंटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे लाखांदूर वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांसह पोलिसांनी शेताजवळ शोधकार्य सुरू केले. यावेळी शेतात डाकराम यांची सायकल दिसून आली. जवळपास शोध घेतला असता खैरी स्मशानभूमीजवळ त्यांचा अर्धवट स्थितीतील मृतदेह आढळून आला. वाघाने हल्ला करून त्यांना ठार जागीच ठार केल्याचे वन आधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला. शेवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. डाकराम यांच्या कुटुंबाला वन विभागाच्या वतीने ५० हजाराची मदत देण्यात आली. मात्र या घटनेमुळे संतप्त गावकऱ्यांनी वन विभागाच्या कार्यालयासमोर गर्दी करत आक्रमक भूमिका घेतली होती.