

भंडारा : ट्रक आणि ट्रॅक्टर खरेदीसाठी घेतलेले कर्ज फेडू न शकल्यामुळे एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना तुमसर तालुक्यातील डोंगरला येथे घडली. राकेश सत्यनारायण ठाकरे (वय ३६, रा. डोंगरला) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राकेशने मिनी आयशर ट्रक आणि ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले होते. मात्र, वाहनांचे कर्ज फेडणे त्याला शक्य होत नव्हते. त्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून तीव्र नैराश्येत होता.
६ ऑगस्ट रोजी राकेशची पत्नी शेतात रोवणीच्या कामासाठी गेली होती. सायंकाळी शेतावरून परत आल्यानंतर तिला घराचा दरवाजा आतून बंद दिसला. तिने राकेशला हाक मारली, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
त्यामुळे पत्नीने आरडाओरड करून गावातील लोकांना गोळा केले. गावकऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता राकेश खिडकीला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
गावकऱ्यांनी त्याला तातडीने तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून तुमसर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.