

भंडारा : मंगळवारी रात्री भंडारा येथील गांधी चौकात पानटपरी बंद करत असलेल्या एका युवकावर लोखंडी रॉड व तलवारीने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी १२ तासांत अटक केली असून, दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे. साकोली तालुक्यातील मोहघाटा-खैरी शेतशिवारात शेतकऱ्यांच्या वेशात जाऊन पोलिसांनी ही धडक कारवाई केली. आरोपींचा माग काढण्यासाठी पोलीस अंमलदार डोक्यावर गवताच्या पेंड्या आणि पाठीवर फवारणी पंप घेऊन शेतात पोहोचले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १०:३० वाजता गांधी चौक येथे फिर्यादी पानटपरी बंद करत असताना नेहरू वॉर्ड (मेंढा) येथील प्रणय उर्फ पन्नू सुनील बोरकर (१९), विक्की प्रमोद मुरकुरे (१९) तसेच दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. आरोपींनी लोखंडी रॉडने डोक्यावर तर तलवारीने पाठीवर वार करून फिर्यादीला गंभीर जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून व वैद्यकीय अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे प्रकटीकरण पथकाने अत्यंत शिताफीने अवघ्या १२ तासांत दोन्ही आरोपींसह दोन बालकांना शेतशिवारातून ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सहायक पोलीस अधीक्षक तेजस सारडा आणि पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या तपास पथकात सहायक पोलीस निरीक्षक आशिष बोरकर, पोलीस उपनिरीक्षक रोशन ओकते, पोलीस अंमलदार अंकुश पुराम, प्रशांत कुरंजेकर, अनुप वाल्दे तसेच पोलीस शिपाई रोहन काळे व रोहित अंबादे यांचा समावेश होता.