

भंडारा : गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चिचखेडा येथील १७ वर्षीय सुचिता बागडे या अल्पवयीन मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी विहिरीत आढळून आला. २६ जानेवारीपासून ती बेपत्ता होती. समाज मंदिर परिसरातील एका विहिरीत तिचा मृतदेह तरंगताना आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
चिचखेडा पुनर्वसन येथील रहिवासी सुचिता राजेंद्र बागडे ही २६ जानेवारीच्या रात्री गूढपणे घरातून निघून गेली होती. विशेष म्हणजे, घराबाहेर पडताना तिने आपल्या वडिलांच्या खोलीचा दरवाजा बाहेरून लावून घेतला होता. मुलगी घरात नसल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तिची सर्वत्र शोधमोहीम राबवली, मात्र ती सापडली नाही. अखेर याप्रकरणी पवनी पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती.
पोलीस आणि नातेवाईक मागील सहा दिवसांपासून सुचिताचा शोध घेत होते. सोमवारी (दि. २) सकाळी ८ वाजेच्या सुमारास ग्रामस्थांना समाज मंदिर परिसरातील विहिरीत एक मृतदेह तरंगताना दिसला. माहिती मिळताच पवनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटवली असता, तो सुचिताचाच असल्याचे स्पष्ट झाले. ऐन विशीच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलीचा असा अंत झाल्याने बागडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृतदेह अनेक दिवस पाण्यात राहिल्याने तो छिन्नविच्छिन्न अवस्थेत होता. मृतदेहाची गंभीर अवस्था पाहता तो रुग्णालयात नेणे शक्य नव्हते. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय पवनी येथील डॉ. योगेश रामटेके आणि डॉ. आचल मेश्राम यांच्या पथकाला पाचारण करून घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.
सुचिताने इतके टोकाचे पाऊल का उचलले? तिने जीवन संपविले की, तिच्यासोबत काही अनुचित प्रकार घडला? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वडिलांच्या खोलीला बाहेरून कडी लावण्यामागचा उद्देश काय होता, हा प्रश्नही अनुत्तरित आहे.
पवनी पोलिसांनी सध्या 'अकस्मात मृत्यू'ची नोंद केली असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलीस उपनिरीक्षक प्रीतम येवले यांनी सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास पवनी पोलीस करत आहेत.