

भंडारा : केवळ टीव्ही आणि गाडीची तोडफोड केल्याच्या किरकोळ वादातून एका ४२ वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी, भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने २४ वर्षीय आरोपीला आजन्म कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. २७ ऑक्टोबर २०२१ रोजी मोहाडी येथील गांधी वॉर्डात घडलेल्या घटनेवर न्यायालयाचा हा निर्णय दिला.
२७ ऑक्टोबर २०२१ रोजी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील गांधी वॉर्डमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. मयत गंगाधर नत्थू निमजे (४२, रा. गांधी वॉर्ड, मोहाडी) यांनी आरोपीच्या कुटुंबातील सदस्य विमल विजय श्रीपाद यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरातील टीव्ही संच आणि एका चारचाकी गाडीचे नुकसान केले होते.
या तोडफोडीच्या घटनेचा राग मनात धरून आरोपी आकाश विजय श्रीपाद (२४, रा. गांधी वॉर्ड, मोहाडी) हा गंगाधर निमजे यांच्या घरी गेला. त्यावेळी त्याने सायकलच्या लोखंडी गिअरने गंगाधर निमजे यांच्या गळ्यावर आणि खांद्यावर दोन्ही हाताने वार करून त्यांना गंभीर जखमी केले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर मयताची पत्नी विद्या गंगाधर निमजे यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी आकाश श्रीपादविरुद्ध भारतीय दंड विधान (भादंवि) कलम ३०२, ४५० आणि ३२३ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी या गुन्ह्याचा तपास केला. त्यांनी आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून तपास पूर्ण केला आणि दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता रजनी मेहर यांनी न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांनी महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवली, ज्यामुळे आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाला.
साक्षीदारांचे महत्त्वाचे जबाब आणि पोलीस तपासातील ठोस पुराव्यांच्या आधारावर, जिल्हा व सत्र न्यायाधिश-२ तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश भारती काळे यांनी आरोपी आकाश विजय श्रीपाद याला दोषी ठरवले.
न्यायालयात कलम ३०२ भादंवि अंतर्गत, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २३५ (२) नुसार आरोपीला जन्मठेपेच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. याव्यतिरिक्त, त्याला ५ हजार रुपये दंडाची शिक्षाही ठोठावण्यात आली.
या संपूर्ण प्रक्रियेत पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास काळे, मोहाडीचे ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे आणि दोषसिद्धी कक्षाचे अधिकारी विनोद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार हरिश्चंद्र चाचेरे यांनी कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.