

भंडारा : शाळा सुटल्यानंतर पतंग उडवण्याच्या क्षुल्लक वादातून अवघ्या १५ वर्षीय शाळकरी मुलाची धारदार लोखंडी हत्याराने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १८) सायंकाळी भंडारा शहरातील मेंढा भागात घडली. पोलीस ठाण्यापासून अवघ्या ४०० मीटर अंतरावर भरदिवसा घडलेल्या या थरारामुळे संपूर्ण शहर हादरले असून, अल्पवयीन आरोपीने थेट पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले आहे.
हंस गजानन येरकडे (वय १५) असे मृत मुलाचे नाव आहे. संशयीत आरोपीही १५ वर्षांचा असून तो मेंढा भागातीलच रहिवासी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हंस येरकडे हा शहरातील भागीरथा भास्कर शाळेत इयत्ता नववीत शिकत होता. शाळे सुटल्यानंतर तो दप्तर घेऊन मेंढा भागात आला आणि पतंग उडवू लागला. तिथे त्याचा संशयीत आरोपीसोबत वाद झाला. त्यानंतर हंस काही मित्रांसह पुन्हा तिथे आला आणि त्याने लोखंडी हत्याराने आरोपीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयीत आरोपीने ते हत्यार हिसकावून घेत उलट हंसच्या छातीवर वार केले. यात गंभीर दुखापत आणि अति रक्तस्राव झाल्याने हंसचा जागीच मृत्यू झाला. त्याची शाळेची बॅग आणि पतंग घटनास्थळीच पडलेली होती. हत्येनंतर आरोपीने थेट पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
घटनेची माहिती मिळताच मृताच्या कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली आणि संशयीत आरोपीला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. पोलिसांनी संतप्त नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र नातेवाईक आक्रमक भूमिकेत असल्याने ठाण्याच्या आवारात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
भंडारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या आठ दिवसांत तीन गंभीर गुन्हे घडल्याने खळबळ उडाली आहे. ६ ऑगस्ट रोजी मेंढाजवळील आंबेडकर वॉर्डात एका तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला होता; त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी शुक्रवारी भागातील 'विघ्नहर्ता हॉटेल'समोर एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.