

भंडारा : अवैध रेती उपसा आणि वाहतुकीसाठी बनावट नंबर प्लेट तसेच दुस-या वाहनांच्या ई-टीपीचा वापर करून शासनाची कोट्यवधींची फसवणूक करणा-या एका रॅकेटचा करडी पोलिसांनी पदार्फाश केला आहे. या कारवाईत १ कोटी ३५ लाख रुपये किमतीचे ३ टिप्पर आणि १ लाख ८० हजार रुपयांची रेती जप्त करण्यात आली. रॅकेटमधील धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचल्याचे समजत आहे.
गुरुवारी (दि. ४) रोजी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास करडी पोलिस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक नागलोत आपल्या पथकासह तिरोडा-तुमसर मार्गावर पेट्रोलिंग करत होते. देव्हाडा खुर्द शिवारातील नायरा पेट्रोल पंपाजवळ (एमएच ४० सीटी ६६००, एमएच ४० बीएल ७२२०, एमएच ४० सीटी ९०६३) क्रमांकाचे तीन टिप्पर अत्यंत संशयास्पद स्थितीत उभे असलेले आढळले. पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता त्यात क्षमतेपेक्षा जास्त रेती भरलेली दिसून आली.
प्रत्येकी ४५ लाख प्रमाणे एकूण १ कोटी ३५ लाख रुपये किंमतीचे ३ टिप्पर, १ लाख ८० हजार रुपये किमती ३० ब्रास रेती जप्त करण्यात आली. तसेच चालक जयेंद्र ठाकूर (४६), रोहीत तोफसिंग चव्हाण (२९ ) आणि योगेश वसंता उईके (३५) (तिघे रा. कन्हान, जि. नागपूर) यांना अटक करण्यात आली. शासकीय महसूल बुडवणे, फसवणूक आणि पर्यावरणाचा ऱ्हास केल्याप्रकरणी चालक व मालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३१८(४), ३३६(३), ३३८, ३ (५) सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम ४८(७) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ नागलोत, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत फरताडे आणि पथकाने केली. या रॅकेटमध्ये आणखी काही बड्या तस्करांचा समावेश असल्याची शक्यता असून, पुढील तपास सुरू आहे.
सुरुवातीला चालकांनी ई-टीपी दाखवून वाहतूक वैध असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सखोल चौकशीसाठी वाहने ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला उभी केली. शुक्रवारी (दि. ५) रोजी जेव्हा चालकांनी मूळ कागदपत्रे सादर केली, तेव्हा पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. वाहनांच्या चेसीस नंबर आणि कागदपत्रांवरील नंबरमध्ये मोठी तफावत आढळली. यावरून हे स्पष्ट झाले की, तस्करी करण्यासाठी मूळ नंबर प्लेट बदलून बनावट नंबर प्लेट लावण्यात आल्या होत्या आणि दुस-याच वाहनांच्या ‘ई-टीपी’ मध्ये फेरफार करून शासनाची फसवणूक केली जात होती.