

भंडारा: गणेशपूर येथील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग दरम्यान, पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक संभाव्य अनुचित प्रकार टळला असून, दोन इसमांकडून दोन लोखंडी चाकू व एक मारुती ब्रेझा कार असा एकूण ६ लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
१ आॅक्टोबर रोजी गुरूवारी गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर दोन इसमांकडून गोंधळ निर्माण करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती भंडारा पोलिसांना प्राप्त झाली होती. पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला संबंधित इसमांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले होते.
मध्यरात्री गुन्हे प्रकटीकरण पथकाने जिल्हा परिषद चौक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना, गणेशपूर रोडवरील जिल्हा परिषद नवीन दुकान चाळ, रमाबाई आंबेडकर वार्ड, भंडारा येथे संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या मारुती ब्रेझा कारची (क्रमांक एम.एच-३६/एजी-३०३०) पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली.
कारमध्ये असलेल्या सुयश सुधाकर बालपांडे (२८, रा. साई मंदिरामागे, तकिया वार्ड, भंडारा) आणि दर्शन कैलास कोचे (२६ वर्षे, रा. रमाबाई आंबेडकर वार्ड, भंडारा) यांची झडती घेतली असता, सुयश बालपांडे याच्याकडून काळ्या रंगाची मूठ असलेला लोखंडी चाकू, तर दर्शन कोचे याच्याकडून लोखंडी चाकू मिळून आला. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही चाकू व वाहन असा एकूण ६ लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध पोलिस स्टेशन भंडारा येथे भारतीय हत्यार कायदा सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे