Bhandara Crime | बाळ विक्री प्रकरण : डॉ. नितेश वाजपेयीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा

छत्तीसगडमधील अल्पवयीन मुलगी निघाली बाळाची माता
POCSO Act
प्रातिनिधिक छायाचित्र. file photo
Published on
Updated on

भंडारा- भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या बाळ विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. नितेश वाजपेयी याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. उपचाराच्या नावाखाली बाळांची विक्री करणाऱ्या या रॅकेटचा तपास सुरू असतानाच, आता गोंदियाच्या रामनगर पोलिस ठाण्यात डॉ. वाजपेयीवर पोक्सो अंतर्गत नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात छत्तीसगडमधील एका अल्पवयीन मुलीची प्रसूती करून तिचे बाळ विकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

डिसेंबर महिन्यात विक्री करण्यात आलेले जे दुसरे बाळ पोलिसांनी हस्तगत केले होते, त्याच्या जन्मदात्यांचा शोध पोलिसांना लागला आहे. छत्तीसगड राज्यातील एका अल्पवयीन मुलीची प्रसूती गोंदिया येथील न्यू बालाजी हॉस्पिटलमध्ये डॉ. वाजपेयी याने केली होती. कायद्यानुसार अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीबाबत पोलिसांना माहिती देणे बंधनकारक असतानाही, डॉ. वाजपेयीने ती माहिती दडवून ठेवली आणि त्या बाळाची विक्री केली. या गंभीर गुन्ह्यासाठी डॉ. वाजपेयीवर पोक्सोच्या कलम ४, ६, ८ आणि २१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुकेश कुमारला अटक
या प्रकरणात पोलिसांनी मुकेश कुमार नावाच्या आणखी एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावरही पोक्सोसह अन्य कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. वरठी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या पहिल्या गुन्ह्यापासून आतापर्यंत डॉ. वाजपेयीसह एकूण सहा जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे विशेष तपास पथक गठीत करण्यात आले असून, उपविभागीय पोलिस अधिकारी शिवम विसापूरे या पथकाचे प्रमुख म्हणून तपास करत आहेत. सध्या डॉ. नितेश वाजपेयी भंडारा पोलिसांच्या ताब्यात असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news