

भंडारा: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर राजेगावजवळ मध्यरात्री दीडच्या सुमारास एका सहाचाकी ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ खळबळ उडाली. तथापि, ट्रकचालकाने प्रसंगावधान राखून वेळेत वाहनाच्या बाहेर उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला. काही क्षणांतच संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने वाहनमालकांचे प्रचंड नुकसान झाले.
छत्तीसगड राज्यातील रायगड येथून नागपूरकडे भुईमूग शेंगांचा मोठा साठा घेऊन निघालेल्या ट्रक क्रमांक सीजी ०४ एन एक्स १९१८ च्या कॅबिनमधून अचानक धुर निघू लागला आणि काही क्षणांतच तीव्र ज्वाळा उठल्या. चालक दीपक श्रीराम पिंजारे (वय २६, रा. बैतूल, मध्य प्रदेश) यांनी तत्काळ प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला आणि वाहनाबाहेर उडी मारली. मात्र ट्रक पूर्णत: आगीत जळून खाक झाला.
आगीच्या तीव्रतेमुळे ट्रकमधील भुईमूग शेंगांचा साठा देखील पूर्णत: भस्मसात झाला. मध्यरात्री महामार्गावर पेटलेल्या या ट्रकचा दृश्य थरारक होते. घटनेची माहिती मिळताच भंडारा अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. मात्र, तोपर्यंत ट्रकचे संपूर्ण अवशेषच उरले होते.
या घटनेचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. आगीमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. मध्यरात्रीच्या काळोखात पेटलेला हा ट्रक आणि आगीचा ज्वालामय थरार पाहून परिसरातील नागरिक आणि प्रवासी थरारले. चालकाच्या चातुर्यामुळे मात्र मोठा अपघात टळला.