Bhandara Accident : रस्त्याच्या कडेला थांबलेली कार ट्रकने उडवली; १३ वर्षीय चिमुरडीसह दोघांचा अंत

विरली बुद्रुक येथील बेद्रे कुटुंबावर काळाचा घाला; चार जण जखमी; दोघांवर नागपुरात उपचार
Bhandara Accident
Published on
Updated on

भंडारा : लाखांदूर तालुक्यातील विरली बुद्रुक येथील एका कुटुंबावर काळाने घाला घातला असून, नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात १३ वर्षीय बालिकेसह एकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, विरली बुद्रुक येथील हिमेश बेद्रे हे कुटुंबीयांसह बल्लारशा येथे बहिणीकडे कामानिमित्त गेले होते. काम आटोपून ते रात्रीच्या सुमारास आपल्या वाहनाने परत येत होते. प्रवासादरम्यान एका हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर काही अंतरावर कोरधा गावाजवळ चेहऱ्यावर पाणी मारण्यासाठी त्यांनी रस्त्याच्या कडेला वाहन थांबविले होते. त्याच वेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, वाहनातील १३ वर्षीय बालिका श्रावणी तसेच मेहुणे नितीन भरे यांचा जागीच मृत्यू झाला.

Bhandara Accident
Bhandara Accident : देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला, भरधाव कार दरीत कोसळली; २४ वर्षीय चालकाचा मृत्यू

या अपघातात हिमेश बेद्रे, त्यांची पत्नी मेथला बेद्रे, मुलगा शौर्य बेद्रे तसेच नितीन भरे यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी गंभीर असलेल्या मेथला बेद्रे यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले असून, हिमेश बेद्रे आणि त्यांचा मुलगा शौर्य यांच्यावर ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या भीषण अपघाताची बातमी विरली बुद्रुक गावात पोहोचताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. या अपघाताचा पुढील तपास संबंधित पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news