Bhandara Accident : काळाचा क्रूर घाला! पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी धावला पिता, ST खाली चिरडून बाप-लेकाचा करुण अंत

Accident
Accident Pudhari
Published on
Updated on

भंडारा : भंडारा एसटी बस आगारात शुक्रवारी सायंकाळी काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना घडली. आपल्या चिमुकल्या मुलाला मृत्यूच्या दाढेतून ओढून काढण्यासाठी गेलेल्या पित्यावर काळाने झडप घातली. बस आगारातील अवघ्या काही सेकंदांच्या या खेळात ४० वर्षीय पिता आणि त्यांच्या ३ वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच अंत झाला. या घटनेने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली असून भंडारा आगारातून हळहळ व्यक्त होत आहे.

मुलाला वाचवताना संपलं आयुष्य

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चांदनी चौक, कुंभार टोली येथील रहिवासी रोहित खेडीकर हे आरओ वॉटर सप्लायचा व्यवसाय करायचे. शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ते आपल्या ३ वर्षांच्या मुलासह दुचाकीने एसटी आगारात आले होते. आगारातील बस रॅम्पच्या मागे आपली दुचाकी उभी करून रोहित काही कामासाठी बाजूला झाले, तर त्यांचा लाडका लेक दुचाकीवरच बसून वडिलांची वाट पाहत होता.

त्याच वेळी रॅम्पवर उभ्या असलेल्या एका एसटी बसच्या चालकाने बस 'रिव्हर्स' (मागे) घेण्यास सुरुवात केली. बस मागे येत असल्याचे आणि आपल्या मुलाच्या जीवावर बेतल्याचे पाहताच रोहित यांच्या पायाखालची जमीन सरकली. आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी ते जिवाच्या आकांताने बसच्या दिशेने धावले. मुलाला बाजूला सारण्याचा प्रयत्न करेपर्यंत बसचे अवाढव्य चाक मायलेकाच्या अंगावरून गेले. या भीषण अपघातात पिता-पुत्राचा जागीच करुण अंत झाला.

भंडाऱ्यात संतापाची लाट

हा अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी पाहणाऱ्यांच्या काळजाचे पाणी झाले. घटनेची माहिती मिळताच भंडारा शहर पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी एसटी प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आगाराच्या आवारात खासगी वाहनांची ये-जा आणि बस चालवताना पाळली जाणारी खबरदारी यावरून संताप व्यक्त केला जात आहे.

प्रशासनाकडून निर्बंध लागू

या दुर्दैवी घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या एसटी आगार प्रशासनाने आता आगाराच्या आवारात सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. सर्वसामान्यांच्या प्रवेशावर आणि खासगी वाहनांच्या पार्किंगवर तातडीने निर्बंध लादण्यात आले आहेत. दरम्यान, रोहित खेडीकर यांच्या जाण्याने खेडीकर कुटुंबाचा आधार हरपला असून, एका हसत्या-खेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, बस चालकावर कारवाई करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news