

भंडारा: रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी आदळल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना अड्याळ-पवनी मार्गावरील मोटघरे महाविद्यालयासमोर बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली.
देविदास शिवराम उपरिकर (५५) रा. वाकेश्वर असे मृतकाचे नाव आहे. देविदास हे बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास दुचाकीने शेंदरी खुर्द येथून वाकेशवर येथे जात असताना ट्रक क्र. एमएच ४९ बीझेड १२५५ हा बंद अवस्थेत रस्त्यावर उभा होता. ट्रकचालकाने धोकादायकरित्या ट्रक उभा करुन, बॅरीकेट लावले नव्हते. दरम्यान, देविदास हे दुचाकीने येत असताना त्यांना अंधारात ट्रक उभा असल्याचे दिसले नाही. त्यामुळे त्यांची दुचाकी थेट त्या ट्रकला आदळली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने देविदास यांना अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तिथे वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध अड्याळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार भूमेश्वर मेश्राम करीत आहेत.