

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : पहिल्या मजल्यावर काम करत असताना अंगावर स्लॅब कोसळल्याची घटना गुरुवारी(दि.25) सोनी येथे घडली. या दुर्घटनेत काम करणाऱ्या एका मजुराचा मृत्यू झाला आहे. प्रफुल्ल प्यारेलाल रामटेके (वय. 25 रा. विर्शी टोली ता. देसाईगंज) असे मृत मजुराचे नाव आहे.
सोनी येथील प्रियंका बावणे यांच्या घर मालकीच्या स्लॅबच्या वरच्या खोलीचे बांधकाम काही वर्षांपूर्वी करण्यात आले होते. ते बांधकाम कच्च्या अवस्थेत असल्यामुळे बांधकाम कोसळण्याची शक्यता होती. त्यांनी मजुरांकडून ड्रिल मशीनने बांधकाम पाडण्याचे काम गुरूवारी (दि.25) सुरू केले होते. दरम्यान बांधकाम कच्चा असल्यामुळे ड्रिलमशिनसह स्लॅबची भिंत मजुरावर कोसळली. त्यात मजुराचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिस विभाग आणि रुग्णवाहिका यांना देण्यात आली. घटनास्थळी पोलिस हवालदार गोपाल कोसरे संदीप बावनकुळे, राहुल कोटांगले यांनी येऊन साक्षदारांसमक्ष पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह लाखांदूर येथे पाठविण्यात आला.