

भंडारा: वाघ बघण्यासाठी उसळलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आलेल्या पोलिस पथकावर हल्ला करुन धक्काबुक्की करणाऱ्यांविरुद्ध पालांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ४ डिसेंबर रोजी अड्याळ वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या किटाळी मांगली परिसरात एक वाघ आल्याचे कळल्याने परिसरातील सुमारे हजारावर बघ्यांची एकच गर्दी उसळली होती.
जमावातील काही लोक वाघावर दगड फेकत होते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने वन विभागाने पालांदूर पोलिसांना बंदोबस्तासाठी पाचारण केले. यावरुन पालांदूरचे ठाणेदार विवेक सोनवाने यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी रवाना झाले. गर्दीतील लोक आरडाओरड करीत होते. जमाव काहीही ऐकण्याच्या स्थितीत नसल्यामुळे पोलिसांकडून जमावाला काठीच्या सहाय्याने पांगविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तेवढ्यात नितेश परसू वाघाडे रा. मांगली, भूषण सेवक नागलवाडे रा. न्याहारवानी, अनिकेत बोरकर रा. मांगली, प्रज्वल जगदिश बोरकर रा. मांगली हे अधिकच उच्छाद मांडताना दिसून आले. ‘पोलिस आमच्याच गावात येऊन आम्हालाच हाकलत आहेत’, असे बोलून काहींनी ठाणेदारांच्या अंगावर चाल केली. त्यांना धक्काबुक्की केली. तसेच अन्य पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली. त्यातील एकाने पोलिस पथकाला ढकलून जमावाला चिघळविण्याचा प्रयत्न करुन शिवीगाळ केली. ‘पोलिसांमुळेच लोकांच्या धावपळीत काहींचे मोबाईल फुटले’, असे बोलून ठाणेदारांना ढकलण्यात आले.
शासकीय कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला करणे, धक्काबुक्की करणे या आरोपाखाली आरोपींविरुद्ध पालांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक नखाते करीत आहेत.