प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.

नईम शेख हत्याकांड : १६ आरोपींविरुद्ध ११७३ पानांचे आरोपपत्र दाखल

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथे चार महिन्यांपूर्वी घडलेल्या नईम शेख याच्या हत्याकांडात सहभागी असलेल्या १६ आरोपींविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात ११७३ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

तुमसर तेथील व्यावसायीक नईम शेख हा २५ सप्टेंबर २०२३ ला सायंकाळी काही साथीदारांसह कारने बालाघाट जिल्ह्यातील तिरोडी येथून तुमसरकडे परत येत असताना गोबरवाही रेल्वे फाटकाजवळ त्याच्यावर प्राणघातक हल्ला करून खून करण्यात आला. या प्रकरणी १६ आरोपींवर पोलिस स्टेशन गोबरवाही येथे विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासातील महत्त्वाचे मुद्दे, त्यातील गांभीर्य आणि सर्व गुन्हेगारांची पार्श्वभूमी तपासून यातील आरोपी संतोष डहाट, सतीश डहाट, शुभम पंधरे, रवी बोरकर, गुणवंत यावकार,आशिष नेवारे, अमन मेश्राम, विशाल मानेकर या ८ आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा १९९९ अन्वये आरोपींवर खटला चालवण्यास मुंबईचे अतिरिक्त पोलिस महासंचालक  संजय सक्सेना यांनी मंजूरी दिली आहे. तर याच  गुन्ह्यातील आरोपी दिलखुश कोल्हाटकर, सचिन भोयर, आशुतोष घडले, विनेक सांडेकर, नरेंद्र पीपलधरे, सुरेंद्र पीपलधरे या सहा आरोपीची मोक्कातून मुक्तता झाली असून त्यांच्यावर राज्य शासनाने मोक्का अंतर्गत कार्यवाही करण्यास मनाई केली आहे.

नईम शेख खून प्रकरणात सहभागी असलेले १२ आरोपी भंडारा, नागपूर, चंद्रपूर या कारागृहात बंधिस्त असून त्यातील दोन आरोपी विनेक सांडेकर, विशाल मानेकर अद्यापही फरार आहेत. तर या खून प्रकरणी  मुख्य आरोपीला आश्रय दिल्याच्या कारणाने विश्वनाथ बांडेबुचे व विजय पुडके यांच्यावर कलम २१२,२१६ अंतर्गत कारवाई करून त्यांच्याविरोधात सुद्धा आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मीता राव करीत आहेत. या हत्याकांडप्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.

logo
Pudhari News
pudhari.news