भंडारा : येथील जंगली प्राण्यांना पळविण्यासाठी लावलेल्या विद्युतवाहिनीचा धक्का बसल्याने १२ वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.१०) सकाळी ७ वाजेदरम्यान तुमसर तालुक्यातील आलेसूर शेतशिवारात घडली. क्रिष्णा लखनलाल अवथरे (वय.१२ रा. आलेसुर) असे मृत बालकाचे नाव आहे.
क्रिष्णा हा मित्रांसोबत गावच्या नाल्यावर बैल धुण्याकरिता गेला होता. बैल धुवून झाल्यानंतर गावाकडे परत येत असताना कोमेश्वर तिलकराम गराट (४०) याने जंगली प्राण्यांपासून पिकाच्या रक्षणासाठी लावलेल्या झटका मशीनच्या ताराला स्पर्श झाल्याने तो चिकटून होता. त्यावेळी लोखंडे नावाच्या बालकाने त्याला काठीने मारून सोडविले. मात्र क्रिष्णाला चक्कर आल्याने तो पुन्हा तारावर पडून जखमी झाला. त्याला लेंडेझरी येथील आरोग्य केंद्रात नेत असता तेथील डॉक्टरांनी तुमसर येथील शासकीयरुग्णालयात रेफर केले. तेथील डॉक्टरांनी तपासून क्रिष्णाला मृत घोषित केले. गोबरवाही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.