

भंडारा; पुढारी वृत्तसेवा शेतीच्या वादातून पुतण्याने वृद्ध काकूचा गळा दाबून खून केला. १ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेचा ५ ऑगस्ट रोजी उलगडा झाला. देवलाबाई किसन गेडाम (वय ५५) रा. देवरी (गोंदी) तालुका लाखनी असे मृत महिलेचे नाव आहे. स्वप्नील अभिमान गेडाम (३१) रा. किटाडी तालुका लाखनी असे संशयीत आरोपी पुतण्याचे नाव आहे. ही घटना लाखनी तालुक्यातील देवरी-किटाडी जंगल परिसरातील रस्त्यावर घडली.
देवलाबाई गेडाम ही जंगलात रानभाज्या गोळा करण्याचे काम करायची. तिचे लग्न किटाडी येथील गेडाम कुटूंबात झाले होते. लग्नाच्या दोन ते तीन वर्षात पतीचे निधन झाल्याने देवलाबाई माहेरी देवरी/गोंदी येथे राहायला आली. परंतु सासरच्या सामूहिक जमिनीवर वारसा हक्काने सातबारावर तिचे नाव होते. तिचा चुलत दिर अभिमान जयराम गेडाम व त्याचा मुलगा स्वप्नील यांच्यासोबत तीचा वाद होता. देवलाबाईला अपत्य नसल्याने तिच्या सासरच्या चुलत कुटूंबाला देवलाबाईला हक्क द्यायचा नव्हता. हा वाद न्यायालयीन प्रक्रियेत सुरू आहे.
घटनेच्या दिवशी संशयीताने जंगलात रानभाज्या शोधताना देवलाबाई देवरी-किटाडी रस्त्यात दिसली. संशयीताने तिला जुना शेतीचा वाद उकरून विचारला. यात त्यांच्यात बाचाबाची झाली. याचवेळी त्याने तिच्या गालावर दोन-तीन थापड मारून जमिनीवर पाडले. त्यानंतर नाक, तोंड व गळा दाबून तिचा खून केला.
दसऱ्या दिवशी २ ऑगस्ट रोजी देवरीच्या पोलिस पाटलांनी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पालांदूर पोलिसांना कळविले. ठाणेदार विरसेन चहांदे घटनास्थळावर पोहोचले. पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर काकडे, सहाय्यक पोलिस अधीक्षक सुशांत सिंग यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू झाला. नागपूर येथे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर सदर मृत्यू नैसर्गिक नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली.
संशयीताने आरोपीने दोन दिवसांपूर्वी किटाडी गावात 'देवलाबाई राहणार नाही व शेतीची कटकट मिटेल' असे बोलल्याचे गुप्त माहितीतून पुढे आले. तो धागा पकडून तपास सुरू केला. यानंतर संशयीत आरोपीला विश्वासात घेऊन विचारणा करताच त्याने खुनाची कबुली दिली. तपास ठाणेदार चहांदे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक राजकुमार मडावी, सहाय्यक फौजदार ओमप्रकाश केवट, नावेद पठाण व भालचंद्र अंडेल करीत आहेत.
हेही वाचा :