भंडारा; पुढारी वृत्तसेवा : भंडारा-बालाघाट राज्य मार्गावर मोटरसायकल झाडावर आदळ्याने अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
तुमसर तालुक्यातील भंडारा-बालाघाट राज्य मार्गावरील रनेरा गावाजवळील वळणावर एका मोटरसायकल चालकाने झाडाला धडक दिली. यात चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २५) रात्री बारा वाजताच्या सुमारास घडली. माणिकराम फुलचंद शहारे (वय ४० वर्ष रा. वारा, जि. बालाघाट मध्य प्रदेश) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शहारे हे आपल्या मोटरसायकलने तुमसरवरून वारा (मध्यप्रदेश) गावाला जात असताना रनेरा येथील वळणावर दुचाकी अनियंत्रित झाल्याने झाडाला जबर धडक दिली. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान आज (दि. २६) सकाळी रनेरा मार्गावर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना तो आढळला. लोकांनी हा प्रकार दिसताच त्यांनी हरदोलीचे उपसरपंच धर्मेंद्र कटरे यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी तत्काळ सिहोरा पोलिस ठाण्यात माहिती दिली. यावेळी सिहोरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालय तुमसरला रवाना केले. घटनेचा अधिक तपास सिहोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार निलेश गोसावी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार किशोर खोब्रागडे व मनोज इडपाते करीत आहेत.